बातम्या

श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर विकास आराखड्यात डोंगर परिसरातील गावांचाही विकास साधा -पालकमंत्री हसन मुश्रीफ

Develop the villages in the hill area in Sri Kshetra Jyotiba Hill Development Plan


By nisha patil - 7/7/2024 12:04:15 AM
Share This News:



कोल्हापूर,  श्री क्षेत्र जोतिबा डोंगर विकास आराखडा सादर करताना यामध्ये श्री ज्योतिबा डोंगरावर येणारे भाविक व डोंगर परिसरातील रहिवाशांच्या सोयी सुविधांचा विचार करा. या परिसरातील 23 गावांमध्ये उत्पादित होणाऱ्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देवून रोजगार निर्मितीला चालना द्या. तसेच या गावांच्या वैशिष्ट्यांचा विचार करुन त्याचा प्रचार प्रसार करा, जेणेकरुन जोतिबा डोंगर परिसरातील या गावांकडे पर्यटकांचा ओघ वाढेल, पर्यटनाच्या माध्यमातून विकास साधला जाईल, अशा सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्या. 

     श्री क्षेत्र जोतिबा डोंगर व परिसरातील गावांच्या विकास आराखड्याचे सादरीकरण आज जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोर करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ .के. मंजूलक्ष्मी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव सुशांत बनसोडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तुषार बुरुड, कार्यकारी अभियंता चंद्रकांत आयरेकर, रोहित तोंदले तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

   श्री जोतिबा विकास प्राधिकरण अंतर्गत संपूर्ण ज्योतिबा डोंगराचा विकास करण्यात येणार असून त्यासोबतच जोतिबा डोंगराच्या परिसरातील 23 गावांचा समावेश यामध्ये करण्यात येणार आहे. हा आराखडा यापूर्वी शासनाला सादर करण्यात आला असून त्याची रक्कम 1530 कोटी रुपये इतकी होती. या आराखड्यामध्ये काही सुधारणा करण्यात आल्यामुळे  सुधारित आराखडा सध्या 1816 कोटी रकमेचा झाला आहे. वाढीव रकमेसह झालेल्या 1816 कोटी रुपयांच्या आराखड्यास आज जिल्हास्तरीय समितीने मंजुरी दिली व हा आराखडा शासनाकडे फेरसादर करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

   पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, आराखडा तयार करताना डोंगर परिसरातील घनकचरा व्यवस्थापन व अन्य सर्व बाबींचा समावेश व्हावा. तसेच पर्यावरण पूरक पद्धतीवर भर देवून अधिकाधिक परिपूर्णरित्या आराखडा तयार करा, असेही त्यांनी सांगितले.

हा आराखडा करताना डोंगराच्या आसपासच्या जंगल परिसराचा विचार करुन प्राणी संग्रहालय तयार करता येईल का याचीही चाचपणी करा. तसेच पर्यावरण पूरक पद्धतीवर भर द्या, अशा सूचना खासदार धनंजय महाडिक यांनी केल्या.
 

जोतिबा डोंगरावर नारळ, फुले, दवणा अर्पण केला जातो. नारळ व निर्माल्याचा पुनर्वापर करुन बचत गटातील महिलांसाठी रोजगार निर्मिती होण्याबाबत विचार करा, असे खासदार धैर्यशील माने यांनी सांगितले.

आर्ट अँड स्पेस स्टुडिओचे आर्किटेक्ट संतोष रामाणे व अभिनंदन मगदूम यांनी आराखड्याचे सादरीकरण केले


श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर विकास आराखड्यात डोंगर परिसरातील गावांचाही विकास साधा -पालकमंत्री हसन मुश्रीफ