बातम्या

आहार : मुलांसाठी आरोग्यदायी टिफिन

Diet  Healthy tiffin for kids


By nisha patil - 10/20/2023 7:35:36 AM
Share This News:



 


डबा कसा असावा, कसा नसावा याबाबत अनेकदा सविस्तर माहिती मिळत नाही. या लेखात डब्यात देण्यासाठी काही पौष्टीक आणि नाविन्यपूर्ण छोट्या सुट्टीसाठी पदार्थांच्या पाककृती पाहूयात!

भोपळ्याचे घारगे भोपळ्याचे खुसखुशीत घारगे बिस्कीटे/ केक/ चॉकलेट यांपेक्षा पौष्टीक तर आहेतच, शिवाय 1 आठवडा घट्ट झाकणाच्या डब्यात चांगले रहातात.


साहित्य:
लाल भोपळा किस: 2 वाट्या
किसलेला गूळ: 1 वाटी
तांदळाचे पीठ: एक वाटी
मिश्रणात मावेल एवढे गव्हाचे पीठ
मीठ: अर्धा टी-स्पून
तूप: 1 टी-स्पून
जायफळ किंवा वेलदोडा पूड चवीपुरती.
तळणासाठी तेल

कृती:
एका कढईत तूप गरम करून त्यात लाल भोपळ्याचा कीस परतून घ्या. झाकण ठेवून एक वाफ काढा. किस मऊ शिजला की त्यात गूळ घाला. गूळ पूर्ण विरघळून उकळी आली की मिश्रणात मीठ घालून ढवळा आणि गॅस बंद करा.मिश्रण थंड झाले की त्यात जायफळ/ वेलदोडा पूड, तांदळाची पिठी आणि मावेल तितके गव्हाचे पीठ घाला. कणिक घट्ट मळा. मळताना पाणी वापरू नका. कणकेचा गोळा तेलाचा हात लावून 15 मिनीटे झाकून ठेवा. 15 मिनीटांनी कणिक पुन्हा चांगली मळा. मध्यम जाडीच्या पुर्या (घारगे) लाटून मध्यम आचेवर तळा.

लालचुटुक ढोकळा
हा ढोकळा दिसायला तर छान दिसतोच पण पौष्टिकही तितकाच आहे! करायलाही सोप्पा आहे.
साहित्य:
बेसन – 1 वाटी
बारीक रवा – 1 टेबलस्पून
दही- अर्धी वाटी
बीटाचा पल्प (घट्ट) – अर्धी वाटी
हिरवी मिरची पेस्ट – 1 चमचा
आल्याची पेस्ट – 1 चमचा
तेल – 1 टेबलस्पून
साखर – 1 टीस्पून
एनो – 1 टीस्पून
हिंग, मीठ – चवीपुरते

फोडणीसाठी साहित्य – तेल, मोहरी, हिंग, कडीपत्ता, तीळ, बारीक चेरलेली कोथिंबीर आणि किसलेले खोबरे
कृती:
एका भांड्यात चाळलेले बेसन, बारीक रवा, आले-मिरची पेस्ट, मीठ, साखर, हिंग एकत्र करावे. त्यात दही आणि बीटाचा पल्प घालून ढवळावे. मिश्रण एकजीव झाल्यावर अर्धा तास झाकून ठेवावे. एका मोठ्या जाड बुडाच्या पातेल्यात एक इंचापर्यंत पाणी भरून गरम करायला ठेवावे. पाणी तापले की मिश्रणात 1 चमचा इनो घालून मिश्रण अलगद हलवावे. तापलेल्या पाण्यात छोटा स्टॅंड ठेवून त्यावर एक पसरट भांडे ठेवावे, त्याला आतून तेलाचा हात लावून त्यात हे मिश्रण ओतावे. पातेल्यावर झाकण ठेवून मिश्रण साधारण 10 मिनीटे वाफवावे. या काळात झाकण उघडू नये. 10 मिनीटांनी मिश्रणात टूथपिक टोचून ती कोरडी बाहेर येत आहे का ते पहावे. ढोकळा बाहेर काढून त्याचे मध्यम आकाराचे काप करावे. वरून गरम फोडणी व खोबरे, कोथिंबीर घालून डब्यात द्यावे.

कोबीच्या वड्या
भाज्या न खाणाऱ्या मुलांसाठी हा नामी उपाय आहे!
साहित्य:
बारीक चिरलेला किंवा किसलेला कोबी – 1 वाटी
बारीक चिरलेली कोथिंबीर – पाव वाटी
बेसन – 2 टेबलस्पून
ज्वारीचे पीठ – 1 टेबलस्पून
तांदळाचे पीठ – 1 टेबलस्पून
लसूण पेस्ट – 2 टीस्पून ओवा, तिखट, हळद, जिरे, मीठ – चवीप्रमाणे.

वड्या परतण्यासाठी तेल
कृती:
एका भांड्यात बारीक चिरलेल्या कोबीमध्ये सर्व पीठे, लसूण पेस्ट, कोथिंबीर व मीठ -ओवा- तिखट- हळद – जिरेपूड घालावे. थोडेसे पाणी घालून मिश्रण घट्ट मळून घ्यावे. तेलाचा हात लावून या पीठाचे 2 ते 3 भाग करून त्याचे रोल्स करावे. कुकरमध्ये पाणी तापवायला ठेवावे. स्टीलच्या भांड्याला आतून तेलाचा हात लावून त्यात हे रोल्स ठेवावे, त्यावर झाकण ठेवावे व कुकरमध्ये रोल्स वाफवून घ्यावेत. (शिट्टया काढू नयेत. वाफ आली की गॅस बंद करावा, गार झाल्यावर कुकरचे झाकण उघडावे.) रोल्सच्या वड्या पाडून तव्यावर थोड्या तेलात परताव्या व डब्यात भराव्या.

नारळ-सुकामेवा लाडू
कधीकधी मुलं गोड खायचा किंवा वेगळं खायचा हट्ट धरतात. अशावेळी तसेच खेळाच्या तासाच्या आधी थोडे काहीतरी पण पौष्टिक असे खायचे असेल तर हे लाडू कामी येतील! कन्डेन्स मिल्कमधून थोडी साखर पोटात जाईल; पण इतर साहित्यातून उत्तम दर्जाची प्रथिने, तंतूमय आणि स्निग्ध पदार्थ मिळतील.

साहित्य:
कन्डेन्स मिल्क – पाऊण वाटी
किसलेले पनीर – 150 ग्रॅम
डेसिकेटेड कोकोनट – 1 वाटी
बारीक चिरलेले बदाम, अक्रोड, काजू, पिस्ते, चारोळ्या – पाऊण वाटी
तूप – 1 टेबलस्पून
वेलदोडा पूड – 2 चिमूट

कृती:
एका जाड बुडाच्या कढईत किसलेले पनीर आणि कन्डेन्स मिल्क एकत्र करा. गॅस सुरु करून हे मिश्रण एकजीव होईपर्यंत हलवा. यात डेसिकेटेड कोकोनट घालून हलवत रहा. मिश्रण घट्ट झाले आणि कढईला न चिकटता सुटू लागले की त्यात बारीक चिरलेला सुकामेवा घाला. नीट ढवळून मग थंड झाल्यावर लाडू वळा.


आहार : मुलांसाठी आरोग्यदायी टिफिन