बातम्या

आहार - आपली प्रकृती कोणती ?

Diet What is your nature


By nisha patil - 7/14/2023 7:27:38 AM
Share This News:



आहार - आपली प्रकृती कोणती ?

प्रकृती ठरवताना अनेक मुद्दे ध्यानात घ्यावे लागतात. अनेकदा एका शरीरामध्ये दोन दोषांचे प्राबल्य असते आणि तशी लक्षणेही दिसत असतात. ज्याला वारंवार पित्ताचा त्रास होतो त्याची प्रकृती पित्ताचीच असेल असे म्हणता येत नाही किवा ज्याला कफाचे विकार वारंवार होतात त्याची प्रकृती कफाचीच असेल असे ठामपणे समजून चालत नाही.

त्यामुळेच आपल्या वैद्याकडून आपली प्रकृती नीट समजून घ्यावी.

प्रकृती विचार हे आयुर्वेदशास्त्राचे एक वैशिष्ट्य आहे. प्रत्येक व्यक्तीचे शरीर हे तीन दोष, सात धातू व तीन मल यांच्या साहाय्याने आपली यंत्रणा कार्यरत ठेवीत असते. प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात वात, पित्त आणि कफ हे तीन घटक (ज्यांना दोष असे आयुर्वेदाने म्हटले आहे) असतात. यामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये वैविध्य आढळते. या तीन दोषांपैकी कोणते तरी दोन किवा एक घटक अधिक उत्कटतेने आपल्या शरीरात कार्य करीत असतात. त्यावरच प्रत्येक व्यक्तीची प्रकृती अवलंबून असते.

प्रकृती म्हणजे व्यक्तीच्या शरीराचा आणि मनाचा स्वाभाविक धर्म होय. प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रकृती भिन्न भिन्न आढळते. म्हणूनच काही जणांना ऊन सहन होत नाही, तर काहींना थंड हवा सहन होत नाही. काहींना जागरण सहन होत नाही, तर काहींना दुपारची झोपही त्रासदायक ठरते. काही जणांना पटकन राग येतो, तर काही जण शांत स्वभावाचे असतात.

खाण्यापिण्याच्या आवडीबाबतीतही प्रत्येक व्यक्तीस भिन्नता आढळते. काही जण गोड आवडणारे असतात, तर काहींना चमचमीत असे अन्न आवडते. ही जी शरीराची काही प्राकृतिक घटना बनलेली असते तिलाच प्रकृती असे आयुर्वेदाने म्हटलेले आहे. वातप्रकृती, पित्तप्रकृती, कफप्रकृती असे प्रकृती प्रकारही त्यावरून पाडलेले आहे. प्रत्यक्षात हे प्रकृतीभिन्नत्व प्रत्येकाला पाहावयास मिळते. पण मग याचा दिनचर्येशी काय संबंध, असा प्रश्‍न स्वाभाविकपणे आपल्या मनात डोकावतो.दिनचर्येमधील आहार आणि विहार यांच्या सवयी आपल्या प्रकृतीनुरूप असाव्यात म्हणजे आरोग्य चांगले राहते.

वातप्रकृती असणाऱ्यांनी व्यायाम करताना जपून करावा. एका वेळेस जास्त व्यायाम होईल अशी कोणतीही पद्धती व्यायामासाठी आचरणात आणू नये. वातप्रकृतीच्या व्यक्तींनी परिश्रमाची कामे सतत करू नयेत. या मंडळींच्या जेवणामध्ये शक्‍यतो स्निग्ध, मधुर, आंबट असे पदार्थ इतर चवींच्या पदार्थांच्या तुलनेने अधिक प्रमाणात असावेत. साजूक तूप असणारे पदार्थ अशा व्यक्‍तींनी अधिक प्रमाणात खावेत. या मंडळींनी थंड वातावरणात अधिक वेळ राहू नये.

पंख्याचा वारा, एअरकंडीशनिंग यांच्या सानिध्यात अधिक वेळ राहू नये. पित्तप्रकृतीच्या व्यक्तींनी अति उष्ण असे पदार्थ खाऊ नयेत. अति मसालेदार, अति तिखट, चमचमीत पदार्थ खाण्यामधून टाळावेत. खूप गरम पाण्याने अंघोळ करू नये. सोसत असल्यास गार पाण्याने अंघोळ करावी. पित्तप्रकृतीच्या व्यक्तींनी जागरण टाळण्याचा प्रयत्न करावा. चहा अतिप्रमाणात पिऊ नये. दूध आणि तुपाचे पदार्थ अधिक प्रमाणात खावेत. खूप उन्हात फिरू नये.

कफ प्रकृतीच्या व्यक्‍तींनी अधिक वेळ झोपेच्या आधीन राहू नये. एकाच ठिकाणी ठिय्या देऊन बसू नये. खूप गोड असे पदार्थ खाऊ नयेत. कडू, तिखट अशा चवींचे पदार्थ खाण्यात असावेत. थंड प्रदेशात अधिक वेळ वावरू नये. अंघोळ करताना गरम पाण्याने करावी. कोणत्या प्रकृतीच्या व्यक्‍तींनी कसा आहार-विहार ठेवावा, हे थोडक्‍यात पाहिले तरी या प्रकृतीच्या व्यक्‍ती ओळखायच्या कशा हा प्रश्न उरतोच. निदान स्वतःची प्रकृती स्वतःला माहिती असायला हवी. म्हणजे योग्य त्या सवयी आपल्या शरीराल लावता येतील. प्रत्येक प्रकृतीची लक्षणे आयुर्वेदशास्त्राने सांगितली आहेत. त्यांचा थोडक्‍यात परिचय असणे आवश्‍यक आहे.

वातप्रकृतीच्या व्यक्ती स्वभावाने अत्यंत चंचल असतात. त्यांच्या वागण्यात विषमता असते. कधी एखादा निर्णय घेण्यास खूप उशीर लावतात, तर कधी चटकन एखादा निर्णय घेतात. त्यांचे शरीर हे कृश, सडसडीत असते. त्यांची भूक ही विषम असते. त्यांचे शरीर हे स्निग्ध नसते. त्वचा कोरडी असते. त्यांचा कोठा जड असतो. त्यांची झोप खंडीत असते. या प्रकृतीच्या व्यक्‍तींचे डोळे झोपेत अर्धवट उघडे असतात. या व्यक्‍तींचा वर्ण सामान्यतः काळा असतो.

पित्तप्रकृतीच्या व्यक्ती या तेजस्वी व करारी असतात. त्यांचा वर्ण गौर असतो. त्यांची त्वचा स्निग्ध आणि तुकतुकीत असते. त्यांचे केस पिंगट असतात. त्यांची भूक तीव्र असते. त्यांना भूक सहन होत नाही. या व्यक्ती कुशाग्र बुद्धीच्या असतात. त्यांना ऊन अजिबात सहन होत नाही. या व्यक्तींना घाम खूप येतो. त्यांचा कोठा हलका असतो. दूध थोडे जास्त घेतले तरी या व्यक्तींना रेच होतात. या व्यक्तींना चटकन राग येतो. त्यांचा बांधा मध्यम स्वरूपाचा असतो. कफप्रकृतीच्या व्यक्‍ती या शरीराने धडधाकट असतात. एखादे वेळी होणारे जागरण या व्यक्ती सहज सहन करू शकतात. या व्यक्तींचीही त्वचा स्निग्ध असते. अत्यंत बुद्धिमान असणाऱ्या या व्यक्ती स्वभावाने शांत असतात. त्यांना गोडापेक्षा तिखट अधिक आवडते. त्यांचे बळ उत्तम असते आणि रोगप्रतिकारकक्षमताही चांगली असते. अर्थात हे वर्णन मार्गदर्शनात्मक आहे. आपल्या वैद्याकडून आपली प्रकृती नीट समजून घ्यावी.


आहार - आपली प्रकृती कोणती ?