बातम्या

ज्वारीच्या भाकरीचे आहारातील महत्त्व; जाणून घ्या फायदे

Dietary Importance of Sorghum Bread


By nisha patil - 12/27/2023 7:27:39 AM
Share This News:



ग्रामीण भागातील लोकं आहारात ज्वारीलाच प्राधान्य देतात. त्यामुळेच त्यांच्या आरोग्याच्या तक्रारी कमी असतात.

दररोजच्या आहारातून जे वेगवेगळे अन्नघटक आपल्या पोटात जातात त्याद्वारे आपल्या शरीराचं पोषण होत असतं. शरीराचं पोषण करणाऱ्या या महत्त्वाच्या घटकांची माहिती आपल्याला असायला हवी. मुख्यत्वे आपल्या जेवणात चपाती, पुरी, पराठा किंवा नान यांचा समावेश असतो. पण त्यापेक्षाही जास्त सकस आणि पोषक असलेल्या ज्वारीचा मात्र आहार म्हणून फार कमी वापर केला जातो. डायट प्लॅनमध्ये तर ती नावालासुद्धा नसते. म्हणूनच शहरी भागात ज्वारीची मागणी कमी झाली आहे. पण ग्रामीण भागात राहणारे लोकं आजही मुख्य अन्न म्हणून ज्वारीलाच प्राधान्य देतात. कदाचित त्यामुळेच शहरातल्या लोकांपेक्षा ग्रामीण भागातील्या लोकांच्या आरोग्याच्या तक्रारी कमी असतात.

आरोग्याच्या दृष्टीकोनातून पाहिलं तर गहू आणि इतर धान्यापेक्षा ज्वारी ही पचायला हलकी आणि आरोग्यासाठी अतिशय गुणकारी ठरते. त्यामुळे आठवड्यातले दोन दिवस तरी आहारात ज्वारीच्या भाकरीचा समावेश करावा. रजोनिवृत्तीच्या काळात शरीरात हार्मोन्सचं प्रमाण कमी-जास्त होतं, अशा वेळेस महिलांनी आहारात ज्वारीचा समावेश करावा. आहारात ज्वारीचे पदार्थ असतील तर स्तनाचा कर्करोग होत नाही, असं संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून सिद्ध झालं आहे. उत्तम गुणधर्मामुळे ज्वारी आरोग्य राखण्यासाठी फायदेशीर ठरते. आहारात ज्वारीचा समावेश केल्यानंतर जाणून घ्या कोणकोणते फायदे होतात...

1 - ज्वारीमध्ये मुबलक प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात. त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. ज्यांना एसिडिटीचा त्रास आहे त्यांनी आहारात ज्वारीचा समावेश करावा. ज्वारीच्या सेवनामुळे मुळव्याधीचा त्रास होत नाही.


2 - किडनीस्टोनचा त्रास असलेल्या व्यक्तीने आहारात ज्वारीचा समावेश केल्यास, पोषक तत्त्वांमुळे हा त्रास कमी होण्यास मदत होते. ज्वारीची भाकरीच नव्हे तर ज्वारीच्या इतर पदार्थांचाही आहारात समावेश करावा.

3 - ज्वारीमध्ये लोह तत्त्वसुद्धा मुबलक प्रमाणात असतं. त्यामुळे एनिमियाचा त्रास असलेल्या व्यक्तीने आहारात ज्वारीच्या भाकरीचा समावेश केल्यास त्यांना फायदा होतो.

4 - फास्ट फूड आणि जंक फूड खाण्यामुळे लठ्ठपणाचं प्रमाण वाढलं आहे. लठ्ठपणामुळे अनेक आजार उद्भवतात. आहारात ज्वारीच्या भाकरीचा समावेश केल्यास अतिरिक्त चरबी कमी होते आणि लठ्ठपणा कमी होतो.

5 - मिनरल्स, पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम हे प्रमुख तीन घटक ज्वारीमध्ये असल्यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयासंबंधिचे आजार नियंत्रित राहतात.

6 - ज्वारीमुळे रक्तवाहिन्यांमधील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होतं. ह्रदयरोग होण्यापासून वाचायचं असेल तर ज्वारीची भाकरी तुम्ही खायलाच हवी.

7 - ज्वारीच्या सेवनामुळे मासिक पाळी आणि गर्भाशयाच्या समस्या उद्भवत नाहीत. त्यामुळे अशा समस्या दूर करण्यासाठा तुम्हाला आहारात ज्वारीचा समावेश करायलाच हवा.

8 - शरीरातलं इन्शुलिनचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी ज्वारी अत्यंत गुणकारी ठरते. त्यामुळे मधुमेहींनी आहारात ज्वारीच्या भाकरीचा समावेश करावा.


ज्वारीच्या भाकरीचे आहारातील महत्त्व; जाणून घ्या फायदे