बातम्या

मलंगगडावरुन आता पुन्हा वाद पेटणार...?

Disputes will flare up again over Malanggad


By neeta - 5/1/2024 4:34:59 PM
Share This News:



मुंबई :  मलंगगडावरुन  पुन्हा वाद पेटण्याची चिन्ह आहेत. मलंगगडावरुन ऑल इंडिया मजलिस मुस्लिमीनचे  अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी  पुन्हा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच, याच मुद्द्यावरुन ओवैसी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्यावरही टीकास्त्र डागलं आहे. मुख्यमंत्र्यांना ही भाषा शोभत नाही, असं म्हणत खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मलंगगड मुक्तीच्या भावना पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या याच वक्तव्यावरुन ओवैसी यांनी परखड टीका केली आहे. 
    मलंगगड मुक्तीच्या भावना पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी दिलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर मलंगगडाच्या नावाचा वाद पुन्हा पेटण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर टीकास्त्र सोडताना एमआयएमएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी स्वस्थ बसणारा नसल्याचा इशारा दिला होता. नरेंद्र मोदी आणि त्यांच्या संबंधित सर्व सरकार मंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी ओवैसी यांनी म्हटलं आहे. 


 नेमकं काय म्हणालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मलंगगड बद्दल?

मलंगगड येथे सुरू असलेल्या हरिनाम सप्ताहाला मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थिती लावलेली. त्यावेळी, स्थानिकांच्या मलंगगड मुक्तीच्या भावनांची आपल्याला कल्पना असून, ती मागणी पूर्ण करणारच, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. तसेच, काही गोष्टी अशा जाहीरपणे बोलता येत नाहीत, असं मुख्यमंत्री म्हणाले होते. 
     मलंगगडावरुन हिंदू आणि मुस्लीम समाजात गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरु आहेत. दोन्ही धर्माचे लोक या जागेवर दावा करतात. काही वर्षांपूर्वी शिवसेना नेते आनंद दिघे यांनी मलंगगड मुक्तीसाठी आंदोलन केलं होतं. शिवसेना आणि स्थानिक हिंदू संघटनांचं हे आंदोलन अजूनही चालू आहे. या आंदोलनाचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंनी उपस्थितांना मलंगगड मुक्तीचं आश्वासन दिलेलं. 

काय आहे नेमकं मलंगगड प्रकरण ? 

मलंगगडाच्या वादाच्या केंद्रस्थानी आहे, हाजी मलंग दर्गा. जो बाराव्या शतकात मध्यपूर्वेतून भारतात आलेला एक सुफी संत बाबा अब्दुर रहमान मलंग यांना समर्पित आहे. हा दर्गा तब्बल 300 वर्ष जुना आहे. ऐतिहासिकदृष्ट्या, मलंगगड मौर्य वंशाचा राजा नालेदेव यानं सातव्या शतकात बांधला होता. सतराव्या शतकात इंग्रजांनी जिंकण्यापूर्वी ते मराठ्यांच्या ताब्यात गेला. हा किल्ला टेकडीच्या तीन छोट्या भागांवर बांधला गेला आहे आणि मुंबईच्या सीमेवर असलेल्या कल्याणमध्ये आहे.

 हिंदू समुदायाचा एक भाग याला मच्छिंद्रनाथ समाधी म्हणून ओळखतो. अनेक भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. हे मंदिर नाथ संप्रदायाच्या परंपरेतील मच्छिंद्रनाथांना समर्पित आहे. नवनाथांचे अवतार श्री मच्छिंद्रनाथ यांचीच ही समाधी असल्याचा दावा काही संप्रदायांकडून केला जात आहे. 
  मलंगड येथे  ही समाधी नाथपंथातील संत मच्छिंद्रनाथांची असल्याचं गोरखनाथ पंथ मानणारे लोक सांगतात. ही बाजू सांगते की, दरवर्षी पालखी निघते, रोज पूजा होते. नैवेद्य अर्पण केला जातो. तर दुसरीकडे तेराव्या शतकात येमेनहून आलेले सुफी संत सूफी फकीर हाजी अब्दुल रहमान शाह मलंग उर्फ मलंग बाबा यांची ही कबर असल्याचं दुसरी बाजू. दोन्ही बाजूंनी जमिनीचा एक एक भाग ताब्यात घेतला आहे. यावरून दोन्ही पक्षांमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. 80 च्या दशकात शिवसेनेने पहिल्यांदाच हा मुद्दा उपस्थित केला होता. हे प्रकरण न्यायालयातही पोहोचले आहे.


मलंगगडावरुन आता पुन्हा वाद पेटणार...?