बातम्या
लोकसभा निवडणूक मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज- अमोल येडगे
By nisha patil - 3/6/2024 6:27:57 PM
Share This News:
जिल्हा निवडणुक अधिकारी अमोल येडगे , संजय शिंदे यांच्याकडून तयारीचा आढावा
• मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जबाबदाऱ्या चोख पार पाडा
* वादळी पावसाची शक्यता गृहीत धरुन उपाययोजना करा
* मतमोजणी कक्ष आणि परिसरात स्वच्छता राखा
• ६८६ अधिकारी- कर्मचारी मतमोजणीसाठी नियुक्त
* प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण
कोल्हापूर: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी मंगळवार ४ जून रोजी होणार असून मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. मतमोजणीची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व नोडल अधिकारी व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोपवलेल्या सर्व जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडाव्या, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या.
लोकसभा निवडणुक मतमोजणीच्या तयारीबाबत आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात बैठक घेण्यात आली. यावेळी श्री. येडगे व हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे यांनी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला. बैठकीला कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल भिंगारे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे, सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, नोडल अधिकारी, सहायक सुक्ष्मनिरीक्षक आदी उपस्थित होते.
४७ कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी शासकीय धान्य गोडाऊन, रमणमळा, कसबा बावडा, कोल्हापूर येथे आणि ४८ हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी शासकीय गोदाम इमारत, राजाराम तलाव जवळ, कोल्हापूर येथे मंगळवार ४जून रोजी सकाळी ८ वाजल्यापासून सुरु होणार आहे. बैठकीत जिल्हाधिकारी श्री. येडगे म्हणाले, मतमोजणी प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस विभागाने मतमोजणी केंद्र परिसरात चोख सुरक्षा व्यवस्था ठेवावी. मतमोजणीसाठी लावण्यात आलेल्या टेबलवर आवश्यक ती साधनसामग्री उपलब्ध करुन द्या. मतमोजणी कक्षात व बाहेर फेरीनिहाय मतमोजणीचे निकाल दर्शवणाऱ्या स्क्रीन बसवल्याची खात्री करा. तसेच या ठिकाणी विद्युत व्यवस्था, पंखे, संगणक, फॅक्स, इंटरनेट व्यवस्था, पिण्याचे पाणी, फिरते स्वच्छतागृह आदी सुविधा दिल्याची खात्री करा. मतमोजणीसाठी उमेदवारांकडून नियुक्त केलेल्या प्रतिनिधींना ओळखपत्र द्या. मतमोजणी कामातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने वेळेत अल्पोपहार व भोजन द्या. तसेच या ठिकाणी सुसज्ज रुग्णवाहिका व आवश्यक ती औषधे व उपकरणे वैद्यकीय पथकासह तयार ठेवा, तसेच मतमोजणी दिवशी वादळी पाऊस आला तरीही ही शक्यता गृहीत धरुन आवश्यक त्या उपाययोजना तयार ठेवा, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी दिल्या. यावेळी त्यांनी मतमोजणी कक्षातील टेबलची रचना, उमेदवार प्रतिनिधींची बैठक व्यवस्था, माध्यम कक्षातील सुविधा, सीसीटीव्ही व्दारे नियंत्रण, सुरक्षा व्यवस्था, मतमोजणी ठिकाणी ये-जा करण्याचे मार्ग आदी विषयांचा आढावा घेतला.
मतमोजणीसाठी ६८६ कर्मचारी नियुक्त, पोलीस विभागाची सुरक्षा
निवडणुकीचा निकाल शांततेत व वेळेवर लागण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. पोस्टलची मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरु होईल. ईव्हीएम मशीनवरील मतमोजणी सकाळी ८.३० वाजता सुरु होईल. ४७ कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी ३४९ तर ४८ हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी ३३७ कर्मचारी असे एकुण ६८६ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त अतिरिक्त १० टक्के कर्मचारी दोन्ही ठिकाणी राखीव असणार आहेत. रमणमळा मतमोजणी केंद्र ठिकाणी ६०० व राजाराम तलाव येथील मतमोजणी केंद्र ठिकाणी ६०० पोलीस कर्मचारी सुरक्षेच्या दृष्टीने तैनात करण्यात आले आहेत.
टेबल संख्या आणि मतमोजणी फेऱ्या-
४७ कोल्हापूरसाठी सहाही विधानसभा मतदार संघात प्रत्येकी १४ मतमोजणी टेबल संख्या असून चंदगड २८, राधानगरी ३१, कागल २६, कोल्हापूर दक्षिण २४, करवीर २६ आणि कोल्हापूर उत्तरची २३ फेऱ्यातून मतमोजणी पूर्ण होणार आहे.
४८ हातकणंगलेसाठी सहाही विधानसभा मतदार संघात प्रत्येकी १४ मतमोजणी टेबल संख्या असून शाहूवाडी व हातकणंगले प्रत्येकी २४, इचलकरंजी १९, शिरोळ व इस्लामपूर प्रत्येकी २१ तर शिरोळसाठी २४ फेऱ्यातून मतमोजणी पूर्ण होणार आहे. प्रत्येक टेबलसाठी प्रत्येकी एक मतमोजणी प्रतिनिधी राहणार आहे़. टपाली मतमोजणीसाठी स्वतंत्र मतमोजणी प्रतिनिधी नियुक्त केले आहेत. ईव्हीएम व टपाली मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर आयोगाच्या सूचनांनुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पाच व्हीव्हीपॅटद्वारे मतमोजणी करण्यात येणार आहे. मतमोजणी कर्मचाऱ्यांना मतमोजणी केंद्रावर मोबाईल, कॅमेरा, ऑडिओ व्हीडीओ रेकॉर्डर- पेन आदी कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू आणण्यास सक्त मनाई आहे.
मतमोजणी टेबलची रचना
1. एक मतमोजणी पर्यवेक्षक
2. एक मतमोजणी सहाय्यक
3.एक शिपाई
4. एक सूक्ष्म निरीक्षक
मतमोजणी ठिकाणच्या सुविधा -
निवडणुकीच्या मतमोजणीसाठी पक्क्या बांधणीचा प्रशस्त मतमोजणी कक्ष तयार करण्यात आले आहेत. याठिकाणी मतमोजणी अधिकारी, कर्मचारी, निवडणूक निर्णय अधिकारी, निरीक्षक, उमेदवार व मतमोजणी प्रतिनिधींसाठी बसण्यासाठी व्यवस्था, पुरेसा विद्युत पुरवठा व जनरेटर बॅकअप, दूरध्वनी, इंटरनेट सुविधा देण्यात आली आहे. याठिकाणी संपूर्ण सुरक्षा व्यवस्था, आग प्रतिबंधक यंत्रणा, पिण्याचे पाणी, चहा, नाश्ता, भोजन व्यवस्था देण्यात येत आहे. तसेच स्वच्छतागृह, प्राथमिक वैद्यकीय सेवा याठिकाणी देण्यात येत आहेत.
लोकसभा निवडणूक मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज- अमोल येडगे
|