बातम्या
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याहस्ते मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ
By nisha patil - 9/8/2024 8:05:24 PM
Share This News:
तरूणांची भविष्यातील सर्व स्वप्न पुर्ण व्हावीत या उद्देशाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची ०९ जुलैच्या शासन निर्णयान्वये अंमलबजाणी करण्यात येत आहे. त्यानुसारच राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे अनुभव देवून त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्याचे काम या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत सुरु आहे असे प्रतिपादन जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. कोल्हापूर जिल्हयात या योजनेची सुरूवात झाली असून प्रातिनिधीक स्वरूपात ३४ उमेदवारांना प्रशिक्षणार्थी म्हणून जिल्हा परिषद आस्थापनेचे नियुक्तीपत्र त्यांच्याहस्ते वितरीत करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, आज कुठेही नोकरी मागण्यासाठी उमेदवार गेला की त्याला अनुभव विचारतात. म्हणून ती अडचणच यामुळे संपेल व त्यांची नोकरीविषयक असलेले स्वप्नही पूर्ण होईल. अनुभवासोबत त्यांना आर्थिक मदतही या योजनेत समाविष्ट आहे. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, उपमुख्य कार्यकारी मनिषा देसाई, कौशल्य विकास विभागाच्या संगीता खंदारे तसेच प्रशिक्षणार्थी उमेदवार उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्हयात ३ हजार रीक्त पदांसाठी या योजनेत नोंदणी केल्याचे सांगितले. ते म्हणाले, जिल्हा परिषदेने कमी वेळेत सर्व प्रक्रिया राबवून चांगली गती दिली, त्यांचे अभिनंदन. युवकांना नोकरीसाठी शासनाने एक चांगली संधी या प्रशिक्षण योजनेतून सुरू केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांनी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे आभार मानले व युवकांना चांगली योजना दिल्याचे सांगितले. प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी मनिषा देसाई यांनी केले तर आभार कौशल्य विकास विभागाच्या संगीता खंदारे यांनी मानले.
या योजनेमध्ये उमेद्वारांचा कार्य प्रशिक्षण कालावधी हा ६ महिने असुन या कालावधीत उमेदवाराला त्याच्या शैक्षणिक अर्हतेनुसार म्हणजेच एच. एच.सी. (१२ वी) करीता ६००० रू., आय.टी.आय/पदविका करीता-८०००रू, व पदवी/पदव्युत्तर -१०००० रू. प्रतीमाह विद्यावेतन शासनाद्वारे देण्यात येणार आहे. प्रत्येक आस्थापनांच्या मंजुर पदांच्या ५ टक्के पदे ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे भरावयाची आहेत. तसेच कार्य प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर संबंधित आस्थापनाकडून प्रशिक्षण केल्याबाबतचे प्रमाणपत्र प्रदान केले जाणार आहे. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता विभागाच्या rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहनही यावेळी पालकमंत्री मुश्रीफ यांनी केले. जिल्हा परिषद कोल्हापूर कडे अधिकारी व कर्मचारी असे एकुण १३७८३ पदे मजुर आहेत. सदर मंजुर पदांचे ५ टक्के प्रमाणे ६८९ पदे या योजनेद्वारे भरावयाची आहेत या करीता https://www.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर जाहिरात पदासाठी प्रसिध्द केली आहे. याकरीता ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषद मुख्यालयामध्ये संगणक ट्रेनी पदाकरीता ७२ पदे, पंचायत समिती / जिल्हा परिषद गणस्तरावर मल्टी पर्पज वर्कर या पदाकरीत १७५ पदे, पशुसंवर्धन विभागा कडील पशुधन सर्वेक्षक ट्रेनी या पदाकरीता १०० पदे, महिला बाल कल्याण विभागाच्या प्रकल्प स्तारावर ग्रॅज्युएट कम्प्यूटर ट्रेनी या पदाकरीता २० पदे, ग्रामिण पाणी पुरवठा विभागासाठी साईट सुपरवाझर या पदाकरीता ५० पदे, आरोग्य विभागाकडे मल्टी पर्रपज हेल्थ वर्कर या पदाकरीता १०१ पदे व शिक्षण सहाय्यक ट्रेनी यासाठी १७१ असे एकुण ६८९ पदांची प्रशिक्षणार्थीची भरती करणेत येणार आहे.
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याहस्ते मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ
|