बातम्या
विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर यांनी घेतला
By nisha patil - 4/24/2024 9:19:37 PM
Share This News:
जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सर्व निर्देशांचे पालन करून त्यांना नेमून दिलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी. मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, अशा सूचना कोकण विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर यांनी दिल्या.
मुंबई उपनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज विभागीय आयुक्त श्री. कल्याणकर यांनी निवडणूक विषयक तयारीचा आढावा घेतला. यावेळी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, विभागीय उपायुक्त (महसूल) विवेक गायकवाड आणि अमोल यादव, अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाड, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) तेजस समेळ यांच्यासह चारही लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, विविध कक्षांचे जिल्हास्तरीय समन्वय अधिकारी उपस्थित होते.
यावेळी विभागीय आयुक्त श्री. कल्याणकर म्हणाले की, निवडणूक आयोगाने ज्या सूचना आणि निर्देश दिले आहेत त्याप्रमाणे कार्यवाही अपेक्षित आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. दिव्यांग आणि ८५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या ज्या मतदारांनी गृह मतदानाचा पर्याय स्वीकारला आहे, त्यांच्या पर्यंत पोहोचून ही प्रक्रिया सुलभपणे पार पाडावी. याशिवाय, निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेचे पालन होईल, यादृष्टीने सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. मुंबई उपनगर जिल्ह्याने निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी केलेल्या तयारीबाबत त्यांनी यावेळी समाधान व्यक्त केले.
निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सी विजील ॲप वर आलेल्या तक्रारीची वेळेत दखल घेऊन त्या तक्रारींचा वेळेत निपटारा करावा. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर मतदारांना कमीत कमी वेळेत मतदान करून बाहेर पडता येईल, अशी व्यवस्था असावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
निवडणूक कालावधीत उमेदवारांच्या खर्चाची तपासणी करण्यासाठीं नियुक्त पथकाने तसेच व्हिडिओ पथक, भरारी पथक यांनी सतर्क राहावयाचे आहे. बँकांकडून संशयित बँक व्यवहारांची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांना दैनंदिन अहवालाच्या स्वरूपात पाठवली जावी. याबाबत बँकांना सूचना द्याव्यात. अवैध मद्य वाहतुकीवरही लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य ती दक्षता घेतली जावी. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडेल, यादृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री क्षीरसागर यांनी, जिल्ह्यातील चारही मतदारसंघात निवडणूक विषयक तयारीची माहिती यावेळी दिली. जिल्हा निवडणूक यंत्रणा ही निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि शांततेच्या मार्गाने पार पाडण्यास सज्ज असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर यांनी घेतला
|