बातम्या

चक्कर येणे

Dizziness


By nisha patil - 2/4/2024 7:31:01 AM
Share This News:



साध्या कारणामुळे चक्कर आली असली तर त्यावर पुढीलप्रमाणे घरगुती उपचार करता येतात.

1. पित्त वाढल्यामुळे चक्कर येत असली तर ताज्या आवळ्याचा रस चार चमचे त्यात चमचाभर खडीसाखर मिसळून घेतल्यास बरे वाटते.

2. रक्‍तदाब कमी झाल्याने चक्कर येत असली तर आल्याचा चमचाभर रस व चमचाभर मध हे मिश्रण थोडे थोडे चाटून खाण्याचा उपयोग होतो.

3. मानसिक क्षोभामुळे, अस्वस्थतेमुळे चक्कर येत असली तर कोहळ्याचा रस चार चमचे व चमचाभर खडीसाखर असे मिश्रण घेता येते.

4. ऊन लागल्यामुळे चक्कर येत असली तर नाकात दुर्वांच्या रसाचे २-३ थेंब टाकण्याचे तसेच टाळूवर आवळकाठीच्या चूर्णात पाणी मिसळून तयार केलेला लेप लावून ठेवण्याने बरे वाटते.

5. फार अशक्‍तपणा जाणवत असला व चक्कर येत असली, बरोबरीने तोंडाला चव नसली तर मनुका खाण्याचा उपयोग होतो. मनुका थोडेसे सैंधव लावून थोड्याशा तुपावर परतून घेतल्या व काही दिवस रोज खाल्ल्या तर गुण येतो.

6. कोणत्याही कारणाने शुक्रक्षय झाला असला (हस्तमैथुन, अतिमैथुन, स्वप्नदोष वगैरेमुळे) व त्यामुळे अशक्‍तपणा येऊन चक्कर येत असली तर रोज अर्ध्या नारळाचे ओले खोबरे वाटून त्यातून निघालेले दूध चवीनुसार साखर टाकून पिण्याचा उपयोग होतो.

7. ताप चढल्यामुळे चक्कर येत असली तर कपाळावर रिठ्याच्या पाण्याच्या घड्या ठेवण्याने बरे वाटते. यामुळे ताप उतरण्यासही मदत मिळते. बरोबरीने तापावर योग्य उपचार करणे आवश्‍यक होय.

8. डोक्‍यात सर्दी साठून म्हणजे डोके जड होऊन चक्कर येत असली तर सुंठीचे बारीक चूर्ण तपकिरीप्रमाणे नाकाद्वारा ओढल्याने बरे वाटते.

9. रक्‍तातील साखर कमी झाल्याने चक्कर आली असता पटकन साखर-पाणी देण्याचा उपयोग होतो.

10. भूक लागली असूनही बराच वेळ काही खाणे झाले नाही तरी चक्कर येऊ शकते. असा वेळी साळीच्या लाह्या, दूध, साखर असे मिश्रण खाण्याने लगेच बरे वाटते.

11. गाडी लागल्यामुळे चक्कर येण्याची सवय असणाऱ्यांना प्रवासाच्या आधी व प्रवासात थोड्या थोड्या वेळाने साळीच्या लाह्या खाण्याचा उपयोग होताना दिसतो.

12. विरळ हवेच्या उंच ठिकाणी जाताना सुती कापडात कापूर, वेलची, ओवा, वेखंड यांच्या पुरचुंडीचा अधूनमधून वास घेण्याने चक्कर येण्यास प्रतिबंध होऊ शकतो.


चक्कर येणे