शैक्षणिक

मुलांना जेवताना टीव्ही-मोबाईल लागतोच? ३ गोष्टी करा

Do children need TV mobile while eatingDo 3 things


By Administrator - 1/15/2025 4:50:01 PM
Share This News:



मुलांना जेवताना टीव्ही-मोबाईल लागतोच? ३ गोष्टी करा, स्क्रीन बघत जेवण्याची सवय कायमची सुटेल.....

घरातले सगळे जण रात्री एकत्र बसून, एकमेकांशी गप्पा मारत जेवत आहेत, असं चित्र आता क्वचितच एखाद्या घरात दिसतं. दिवसभर सगळे कामानिमित्त, शाळेमुळे घराबाहेर असतात. त्यामुळे दुपारी एकत्र येऊन जेवण करणं जमत नसल्याने रात्री आवर्जून सगळे वेळ काढून एकत्र बसतात, असं चित्र काही वर्षांपुर्वी घरोघरी असायचं ते मात्र आता दुर्मिळ झालं आहे. पालकच मोबाईल आणि टीव्ही बघत जेवण करतात. तिथे लहान मुलांची काय कथा.. पण मुलांची ही सवय तोडायला हवी असं आहारतज्ज्ञ, डॉक्टर वारंवार ओरडून सांगतात. पण मुलं टीव्ही आणि मोबाईलच्या एवढी आहारी गेली आहेत की त्यांची ती सवय आता काही सुटत नाही. अशावेळी काय करावं जेणेकरून त्यांचं टीव्ही, मोबाईल बघत जेवण करणं बंद होईल, असा प्रश्न पडला असेल तर हे काही उपाय करून पाहा...

मुलांची टीव्ही, मोबाईल बघत जेवण्याची सवय बंद व्हावी म्हणून उपाय...

१. जेवायला मागेपर्यंत देऊ नका...
बऱ्याचदा पालक मुलांना घड्याळाची वेळ पाहून जेवायला देतात.

पण जर तुम्हाला मुलांची टीव्ही, मोबाईल बघत जेवण करण्याची सवय मोडायची असेल तर ते जोपर्यंत जेवायला मागत नाहीत तोपर्यंत त्यांना जेवायला देऊ नका. कारण जेव्हा खरोखर कडाडून भूक लागते तेव्हा टीव्ही- मोबाईल असं काही लागत नाही. मुलं तुमच्याशी वाद न घालता निमूटपणे जेवायला बसतील.

२. गोष्टी सांगा, गप्पा मारा...
मुलांना एकटं जेवायला आवडत नसतं. त्यांना जेवताना काहीतरी विरंगुळा हवा असतो. त्यामुळे मुलं जेव्हा जेवायला बसतील तेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी वेळ काढा.

त्यांच्याशी गप्पा मारा. त्यांना शाळेत, ट्यूशनमध्ये, क्लासमध्ये काय झालं ते विचारा. तुम्हीही दिवसभरात काय काय केलं, काही गमतीजमती झाल्या असतील तर त्या सांगा. गप्पा मारण्यात मुलं रमत गेली की टीव्ही, मोबाईलपासून दूर जातील. पुर्वी एकत्र बसून जेवण करताना हेच तर सगळं होत होतं.. 

३. वेगवेगळ्या वस्तू दाखवा...
जर तुमची मुलं अगदी १ ते ४ वर्षांची असतील तर अशा मुलांना जेऊ घालताना बाल्कनीमध्ये किंवा अंगणात न्या. तिथे त्यांना वेगवेगळी झाडं, फुलं, पक्षी, फुलपाखरं, कुत्रा- मांजर असे प्राणी दाखवा.

एखाद्या पुस्तकातली चित्रं दाखवा, गाणी म्हणा, गोष्टी सांगा आणि अशा पद्धतीने त्यांचं मन रमवत जेऊ घाला. काही दिवस करून पाहा.. मुलांना टीव्ही, मोबाईलची आठवणही येणार नाही.


मुलांना जेवताना टीव्ही-मोबाईल लागतोच? ३ गोष्टी करा
Total Views: 79