बातम्या

तुम्हीही तेलाचा पुनर्वापर करता का ? ठरू शकते घातक

Do you also recycle oil


By nisha patil - 6/30/2023 7:34:36 AM
Share This News:



आजकाल सर्व घरात स्वयंपाकासाठी तेलाचा वापर वेगाने वाढत आहे. बऱ्याच घरांत पुरी, भजी किंवा एखादे तळण केल्यानंतर  उरलेले तेल परत वापरले जाते,
तेलाचा
हा पुनर्वापर सामान्य आहे.

जवळजवळ प्रत्येक घरातील लोक उरलेले स्वयंपाकाचे तेल वापरतात. काही तळण्यासाठी वापरलेले तेल नंतर लोक भाजी, पराठे किंवा इतर कोणत्याही पदार्थ तयार  करण्यासाठी वापरतात. पण दुसरा पदार्थ तयार करण्यासाठी एकदा वापरलेल्या तेलाचा पुनर्वापर करणे हे खूप हानिकारक ठरू शकते. खरंतर एकदा वापरलेले तेल पुन्हा वापरण्यामुळे आपल्या आरोग्याचे (bad for health) नुकसान होते.

कॅन्सरचा वाढतो धोका

जर तुम्ही एकदा वापरलेले तेल पुन्हापुन्हा वापरत असाल तर कॅनसरचा धोका लक्षणीय वाढतो. खरंतर तेल वारंवार गरम केल्याने त्यात फ्री रॅडिकल्स येऊ लागतात. यासोबतच त्यातील सर्व अँटी-ऑक्सिडंट्सही नष्ट होतात. अशा परिस्थितीत त्यामध्ये कॅन्सरचे घटक वाढू लागतात, जे अन्नाद्वारे तुमच्या शरीरात प्रवेश करतात. वापरलेल्या तेलाच्या वापरामुळे पोटाचा कॅन्सर, पित्ताशयाचा कॅनसर, यकृताचा कॅन्सर इत्यादी रोगांचा धोका वाढतो.

होऊ शकतो हृदयविकार

वापरलेल्या तेलाचा वारंवार पुनर्वापर केल्याने तुम्हाला हृदयविकाराची समस्याही होऊ शकते. खरंतर, एकदा वापरलेल्या तेलाच्या पुनर्वापरामुळे तुमच्या शरीरातील चरबीचे प्रमाण वाढते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. वापरलेले तेल पुन्हा जास्त आचेवर गरम केल्याने त्यातील चरबी ट्रान्स फॅट्समध्ये रूपांतरित होते, जे आपल्या शरीरासाठी अत्यंत हानिकारक असते. अशावेळी तेलाचा वारंवार पुनर्वापर केल्यास हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यताही वाढते.

पोटाचे आजार

उरलेल्या तेलाचा वारंवार पुनर्वापर केल्यास पोटाच्या समस्या वाढू शकतात. वापरलेले तेल पुन्हा वापरल्याने, तुम्हाला अल्सर, ॲसिडिटी, जळजळ असे अनेक त्रास होऊ शकतात. एवढेच नव्हे तर उरलेल्या तेलाचा वापर आपल्या पचनासाठीही चांगला नसतो. यामुळे अपचन, बद्धकोष्ठता आणि जुलाब यासारख्या समस्याही उद्भवू शकतात.

मधुमेह आणि लठ्ठपणा

तळणानंतर उरलेले तेल पुन्हा वापरल्याने लठ्ठपणाही होऊ शकतो. एवढेच नाही तर उरलेल्या तेलापासून बनवलेले अन्न सेवन केले तर मधुमेहाचाही त्रास होऊ शकतो. त्यामुळे वापरलेले तेल पुन्हा वापरणे शक्य तितके टाळावे.

ब्लड प्रेशरसाठी हानिकारक

तुम्हाला जर उच्च रक्तदाब असेल तरी उरलेले तेल वापरणे टाळावे. वारंवार गरम केल्याने, तेलामध्ये फ्री फॅटी ॲसिडस् आणि रॅडिकल्स बाहेर पडतात, ज्यामुळे रक्तदाब अनियंत्रित होऊ शकतो.


तुम्हीही तेलाचा पुनर्वापर करता का ? ठरू शकते घातक