विशेष बातम्या

नियमित 'खजुर' खाण्याचे 'हे' गुणकारी फायदे तुम्हाला माहित आहे का?,

Do you know the health benefits of eating dates regularly


By nisha patil - 12/6/2023 7:27:44 AM
Share This News:



खजूर हे सुक्‍या मेव्यातील फळ सगळ्यांनाच आवडते. जातीनुसार खजुराची गोडी बदलते पण, सर्वच खजुरात भरपूर प्रथिने, कर्बोदके, शर्करा, सेल्युलोज असते म्हणून पोषक अन्न म्हणून खजूर अत्यंत उपयुक्त आहे.

हा खजूर आपल्यापर्यंत येतो तरी कसा…

तर ताड-माडाच्या 2800 प्रकारातील हे एक खजुराचे झाड. ह्या झाडांना पामही म्हणतात. खजुराचे झाड कोरड्या आणि उष्ण हवामानात, वालुकामय रेताड वाळवंटात वाढते. हे झाड साधारणत: इजिप्त आणि अरब देशांत जास्त करून होते. वनस्पतीशास्त्रात “फिनिक्‍स डॅक्‍टिलीफेरा’ म्हणून ते ओळखले जाते.

साधारणत: प्राचीन काळापासून (सुमारे 6500 वर्षांपासून) खजुराची मानवाला माहिती आहे. खर्जुर, खर्जुरी अशी संस्कृतातही खजुराची नावे आहेत. इजिप्तच्या 5000 वर्षांपूर्वीच्या इमारतीच्या भग्नावशेषात खजुराची शिल्पे आढळतात, तसेच कुराणातही खजुराचे कौतुक केले आहे.

साधारण 25 मीटर उंचीचे (100 फूट) खजुराचे झाड एकावेळी 100 हिरव्यागार झावळ्यांनी डवरलेले असते. शिंदीच्या झाडाप्रमाणे टोकदार काटेरी पानांनी बनलेल्या याच्या झावळ्या असतात.

पपईच्या झाडाप्रमाणे, नरपुष्पे आणि मादीपुष्पे येणारी दोन वेगवेगळी झाडे खजुरामध्ये असतात. मादी झाड आठ वर्षांचे झाल्याखेरीज फळधारणा होत नाही; परंतु मादी झाडाची पूर्ण वाढ मात्र 30 वर्षांनंतरच होते, जेव्हा मादी झाडाच्या बुंध्यातून वेगळा अंकूर बाहेर येऊन वाढू लागतो. खजुराच्या झाडाचे आयुष्यमान साधारणत: 100 वर्षांचे असते.

मादी झाडांवर येणाऱ्या फुलांवर नरपुष्पातील पुंकेसराची शिंपण झाल्याखेरीज “खजुराची’ फलधारणा होत नाही. नैसर्गिकरीत्या वाऱ्यामुळे, कीटकांमुळे हे काम होत असते; परंतु लागवड केलेल्या झाडांसाठी, नरपुष्पांच्या झाडांवरून फुले काढून, त्यांचे पुंकेसर वेगळे काढून ते मुद्दाम मादी झाडाला फुले आल्यावर, मादी पुष्पांवर शिंपडतात.

हे काम काळजीपूर्वक प्रत्येक झाडावर चढून हातानेच करावे लागते. तसेच प्रत्येक झाडाला एकाचवेळी मोहोर येतो असे नाही. त्यामुळे वारंवार मादीपुष्पांच्या वाढीकडे लक्ष ठेवून हे काम करावे लागते. ह्या कामासाठी कुठलीही यंत्रणा उपयोगी पडत नाही.

झाडाला जेव्हा खजूर लागतात तेव्हा ते गुच्छाने-घोसाने येतात. एका घोसात जवळपास 100 खजूर किंवा 12 किलोपर्यंत खजूर असतात. एकावेळी एका झाडावरचे सगळे घोस मिळून सुमारे 1000 खजूरही लागतात. एक झाड वर्षाकाठी सरासरी 250 किलो खजूर देते.

जगातील 70 टक्‍के खजुराचे उत्पादन अरब देशांच्या वाळवंटी प्रदेशात होते, भारतात कच्छचे रण, राजस्थान, पंजाबचा काही प्रदेश आणि गुजरात महाराष्ट्राचा सीमावर्ती प्रदेश येथे खजुराची झाडे आहेत.

खजुराचे मुख्य तीन प्रकार आहेत …
मध्यम कोरडा खजूर: यात दायरी, दिग्लेट नूर, झाहिदी या पोटजाती आहेत.
मऊ ओला खजूर: यात बारही, हळवी, खद्रावी आणि मेदजूल या पोटजाती आहेत.
कोरडा खजूर: थुरी

बारही, हळदी किंवा सोनेरी रंगाची, कधी हिरवट झाक असणारी तर मेदजूलची तपकिरी ते लाल रंगाची असतात. झाहिदी लालभडक, दिग्लेट नूर गर्द काळपट लाल किंवा मरून रंगाची असतात. आपल्याकडील खजुराचे मुख्य प्रकार बारही, मेदजूल आणि थुरीपैकी असले तरीही इदलशाही, असोली, थेट्टीयार, लोहार अशा यांच्या पोटजाती आहेत.

खजूर आरोग्यदायी :
आजारातून उठल्यावर खजूर खाल्ल्याने शक्ती लगेच भरून येते. खजुराचा डॉक्‍टरांच्या टॉनिकसारखा उपयोग होतो. नुसता खजूर हा उष्णदायी असल्याने अनुपान म्हणून दूध आणि साजूक तूप यातील एका घटकाचा उपयोग करतात.
गरोदर स्त्रियांना पोषक अन्न म्हणून रोज 3/4 खारका किंवा खजूर खायला दिल्यास त्यांना त्या उपयोगी ठरतात.
एरवी सुद्धा खजुराचा वापर अधूनमधून ठेवल्यास आपली कार्यक्षमता वाढते, शक्ती वाढते.
अशक्त माणसांना खजुराची खीर द्यावी.

पण तरीसुध्दा खजूर हा उष्ण असतो त्यामुळे तो अति खाणेही धोकादायक असते हे लक्षात ठेवावे. खजूरपाक, खीर, केक, लोणचे अशा विविध प्रकारांनी आहारात खजुराचा समावेश करणे आरोग्यदायी आहे.

हळीव :
चवीला कडू गुणाने उष्ण, बलवर्धक, पुष्टिदायक, वातहारी, गुल्मनाशक, असते. हळीवाने त्वचा उजळते हळीव तपकिरी रंगाचे मोहरीच्या दाण्यासारखे असते. हळीवाला आयुर्वेदात महटत्त्वाची वनऔषधी मानले आहे. हाडांना बळकटी आणते. पाठदुखी व सायटिका यासारख्या विकारावर हळिवाची खीर देतात.

हळिवाची खीर करायला अतिशय सोपी आहे. दूध उकळून घ्यावे उकळलेल्या दुधात हळीव टाकावी व ते मऊ शिजू द्यावे मग दूध खिरीसारखे आहाळले असता त्यात गूळ किंवा साखर घालावी अशी खीर उपयुक्‍त औषधी आहे. या खिरीच्या सेवनामुळे वायूचा नाश होतो. बाळंतिणीस बाळंतपणानंतर ही खीर देतात त्यामुळे बाळंतिणीस अंगावर दूध चांगले येते.

पाठदुखीच्या विकारातही ही खीर खावी. उचकी लागली असता हळीव पाण्यात भिजत ठेवून थोड्या वेळाने गाळावेत व ते पाणी प्यावे. म्हणजे उचकी थाबते. लहान बाळाला उचकी येत असेल तर असे पाणी देतात. या पाण्यात किचीत साखर घालतात. अशा प्रकारे हळीव ही एक वनऔषधी आहे.


नियमित 'खजुर' खाण्याचे 'हे' गुणकारी फायदे तुम्हाला माहित आहे का?,