बातम्या

घरगुती सिलेंडरच्या किमती उद्यापासून 200 रुपयांनी होणार कमी

Domestic cylinder prices will be reduced by Rs 200 from tomorrow


By nisha patil - 8/29/2023 7:49:55 PM
Share This News:



 

 देशभरातील महिलांना मोदी सरकारने राखी पोर्णिमेच्या एक दिवस आधी मोठं गिफ्ट दिलं आहे. उद्यापासून म्हणजे बुधवारपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती  या 200 रुपयांनी कमी होणार असल्याची मोठी घोषणा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी केली आहे. 

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी सांगितलं की, ओनम आणि राखी पोर्णिमेच्या निमित्ताने मोदी सरकारने देशभरातील महिलांना गिफ्ट दिलं आहे. बुधवारपासून देशात घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती 200 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत 75 लाख भगिनींना मोफत गॅस कनेक्शन मिळणार आहे. त्यासाठी त्यांना एक रुपयाही द्यावा लागणार नाही. पाईप, स्टोव्ह आणि सिलिंडरही मोफत मिळेल. जगभरात गॅसच्या किमती वाढल्या आहेत, मात्र भारतात त्याचा परिणाम कमी आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत यापूर्वी 200 रुपये अनुदान होते, तर आजपासून त्यावर 200 रुपयांच्या अतिरिक्त अनुदानाचा लाभ मिळणार आहे. म्हणजेच आता उज्ज्वला योजनेत येणाऱ्यांना 400 रुपये अनुदान मिळणार आहे. 33 कोटी लोकांकडे गॅस सिलेंडर कनेक्शन आहेत. त्याचबरोबर 75 लाख नवीन कनेक्शन दिले जाणार आहेत. त्यासाठी 7680 कोटी खर्च येणार आहे. 

उज्ज्वला सिलेंडरसाठी केंद्र सरकार प्रत्येक कनेक्शनसाठी 3600 रुपये खर्च करत असून आतापर्यंत 9.60 लाख महिलांना उज्ज्वला सिलेंडरचा लाभ देण्यात आल्याचं केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी सांगितलं. आताही यामध्ये 75 लाख नवीन महिलांना उज्ज्वला योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 

मोदी सरकार 2014 साली ज्यावेळी सत्तेत आलं होतं त्यावेळी 14.5 कोटी लोकांकडे गॅस कनेक्शन होतं. पण आता देशातल्या 33 कोटी लोकांकडे गॅस कनेक्शन असल्याचं अनुराग ठाकुर यांनी सांगितलं. 

घरगुती गॅस सिलेंडरची किंमत सध्या 1100 रुपयांच्या वर असून मोदी सरकारच्या या ताज्या निर्णयामुळे बुधवारपासून ती 900 रुपयांपर्यंत कमी होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळणार आहे


घरगुती सिलेंडरच्या किमती उद्यापासून 200 रुपयांनी होणार कमी