बातम्या

हद्दवाढीबाबत शहरवासीयांची दिशाभूल करू नका : आमदार जयश्री जाधव

Dont mislead city dwellers about limit increase


By nisha patil - 9/14/2023 5:45:05 PM
Share This News:



कोल्हापूर : कोल्हापूर शहराची हद्दवाढ झालीच पाहिजे, यासाठी मीही आग्रही आहे आणि माझाही पाठपुरावा सुरू आहे. हद्दवाढीबाबत प्रशासकीय पातळीवरती हालचाली सुरू आहेत. मात्र, महापालिकेच्या हद्दवाढीबाबत मुंबईत कोणतीच बैठक मुख्यमंत्र्यांनी घेतली नसताना, काहीजण चुकीची माहिती देऊन शहरवासीयांची दिशाभूल करत आहेत. त्यांनी जनतेची दिशाभूल थांबवावी असे आवाहन आमदार जयश्री जाधव यांनी प्रसिद्ध पत्राद्वारे केले.

आमदार जयश्री जाधव म्हणाल्या, कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न गेल्या पन्नास वर्षापासून प्रलंबित आहे. शहराची हद्दवाढ झालीच पाहिजे, ही जनभावना आहे. त्यामुळे कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे, यासाठी माझा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. हद्दवाढीबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवेदने दिली आहेत. लक्षवेधी, औचित्याच्या मुद्दा याच्या आधारे विधानसभेत हद्दवाढीचा प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी मंत्री उदय सामंत यांनी महापालिका निवडणुकीनंतर हद्दवाढ करण्याचे आश्वासन दिले होते. याबाबत नाराजी व्यक्त करून, हद्दवाढीचा प्रश्न त्वरित सोडवावा यासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे. नुकत्याच झालेल्या अधिवेशनात सभागृहात प्रश्न उपस्थित करण्यास परवानगी मिळाली नाही. यामुळे विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन करून, हद्दवाढीच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधले होते. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कोल्हापूरच्या हद्दवाढीबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी व्यापक बैठक घ्यावी असे निर्देश दिले आहेत. परंतु आद्याप मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी बैठक घेतलेली नाही. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत लोकप्रतिनिधी, कृती समिती यांची व्यापक बैठक घ्यावी असे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना दिले होते. मात्र अद्याप बैठक झालेली नाही. मात्र हद्दवाढीसाठी शासन सकारात्मक आहे. 
 

मंत्रालयातून १ सप्टेंबरपासूनचा मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयीन कामकाजाची माहिती घेतली असता, कोल्हापूर हद्दवाढीबाबत मुख्यमंत्र्यांनी कोणतेही बैठक घेतली नसल्याचे स्पष्ट होत आहे. असे असतानाही काहीजण कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतल्याचे खोटे सांगून जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोप आमदार जयश्री जाधव यांनी केला.


हद्दवाढीबाबत शहरवासीयांची दिशाभूल करू नका : आमदार जयश्री जाधव