बातम्या
डॉ. संजय डी. पाटील यांचा ‘कृषी भूषण’ पुरस्काराने सन्मान
By nisha patil - 12/8/2023 8:51:40 PM
Share This News:
कोल्हापूर/ डी. वाय. पाटील कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठ, तळसंदेचे कुलपती आणि डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांना झी मीडिया कॉर्पोरेशनच्यावतीने ‘कृषी भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंढे यांच्या हस्ते डॉ संजय डी पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी झी-२४ तासचे संपादक निलेश खरे यांच्या प्रमुख उपस्थिती होती.
झी मीडिया कार्पोरेशनच्यावतीने पुण्यातील हॉटेल जे. डब्ल्यू मॅरीएट येथे 12 ऑगस्ट रोजी शेतकरी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेमध्ये कृषी क्षेत्राच्या माध्यमातून सामाजिक विकासामध्ये अमूल्य योगदान दिल्याबद्दल डॉ. संजय डी. पाटील यांना ‘कृषी भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कृषी धनंजय मुंढे यांच्या हस्ते डॉ. पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला यावेळी डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त तेजस सतेज पाटील उपस्थित होते. यावेळी झी मीडियाचे संपादक निलेश खरे, मार्केटिंग हेड राहुल सुपारे, काँगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, केव्हीकेचे संचालक राजेंद्र पवार, शेतकरी संघटना नेते रघुनाथदादा पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्यासह कृषी क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.
डॉ. संजय पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील तळसंदे(ता.हातकणगले) येथे सुमारे २०० एकर खडकाळ- मुरमाड जमिनीचे प्रचंड मेहनतीने गोल्डन लँड मध्ये रूपांतर केले आहे. या ठिकाणी शेतीतील विविध प्रयोग डॉ. पाटील यांनी यशस्वीपणे राबवले आहेत. विविध प्रकारची फळे व भाजीपाला यांचे उत्पादन घेतले जाते.
शेतकऱ्यांना कृषी व तंत्रज्ञानाची माहिती मिळावी व त्या माध्यमातून त्यांच्या जीवनात आर्थिक उन्नती यावी यासाठी डॉ. पाटील यांनी कृषी विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालय, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय या ठिकाणी सुरू केले. त्याचबरोबर आधुनिक कृषी व तंत्रज्ञान विषयक शिक्षण देण्यासाठी दोन वर्षांपूर्वी या ठिकाणी डी. वाय. पाटील एग्रीकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटीची स्थापना केली. तळसंदे सारख्या ग्रामीण भागात कृषी आणि तंत्रज्ञानाचे आधुनिक शिक्षण देणाऱ्या या विद्यापीठाच्या माध्यमातून संशोधनासाठीही त्यांनी नवे व्यासपीठ मिळवून दिले आहे. डॉ. संजय डी. पाटील कृषी विकासासाठी सातत्याने देत असलेल्या योगदाना बद्दल त्यांना या विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले.
या शेतकरी परिषदेत कृषी शिक्षण व व्यवसाय संधी या विषयावरील परिसंवादात डॉ. डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी महविद्यालय तळसंदेचे प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील यांनी कृषितील विविध अभ्यासक्रम, शाखा, संशोधन व करिअर संधी याबाबत माहिती दिली.
पुणे: डॉ. संजय डी. पाटील यांना ' कृषी भुषण' पुरस्काराने सन्मानित करताना राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंढे. समवेत विश्वस्त तेजस स. पाटील, निलेश खरे आदी.
डॉ. संजय डी. पाटील यांचा ‘कृषी भूषण’ पुरस्काराने सन्मान
|