बातम्या
डॉ स्वामिनाथन यांचे कार्य प्रेरणादायी: कुलगुरू डॉ. के. प्रथापन
By nisha patil - 9/10/2023 4:44:41 PM
Share This News:
डी.वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात डॉ स्वामिनाथन याना श्रद्धांजली
कोल्हापूर: हरित क्रांतीचे जनक डॉ. एम एस स्वामीनाथन यांचे कार्य कौतुकास्पद आहे. भारताच्या कृषी विज्ञान क्षेत्रात त्यांनी क्रांती घडवून आणली. आपला देश, विशेषतः शेतकरी समृद्ध व्हावेत, असे त्यांना मनापासून वाटत असे, असे प्रतिपादन डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ के प्रथापन यांनी केले. डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात आयोजित डॉ स्वामिनाथन यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कुलसचिव प्रा. डॉ जयेंद्र खोत, रिसर्च डीन डॉ मुरली, परीक्षा नियंत्रक डॉ जयंत घाटगे, रिसर्च डायरेक्टर डॉ संदीप वाटेगावकर, असोसिएट अकॅडमीक डीन डॉ अनिल गायकवाड यांच्यासह कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
डॉ प्रथापन पुढे म्हणाले" अगदी तरुण वयात, डॉ. स्वामिनाथन अमेरिकन कृषिशास्त्रज्ञ डॉ. नॉर्मन बोरलॉग यांच्या संपर्कात आले. त्यांचा आदर्श ठेवत स्वामिनाथन यांनी आपली वाटचाल सुरू केली. १९५० साली, अमेरिकेत व्याख्यातापदी काम करण्याची त्यांना संधी मिळत होती, मात्र त्यांनी ती विनम्रपणे नाकारली. कारण, त्यांना भारतात आणि भारतासाठी काम करायचे होते.
भारतासमोर असलेल्या अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत, ते एखाद्या अविचल पर्वतासारखे अढळ राहून, देशाला आत्मनिर्भर आणि आत्मविश्वासपूर्ण बनवण्याचे काम करत होते, ती परिस्थिती आपण सर्वांनी समजून घ्यायला हवी. स्वातंत्र्यानंतरच्या दोन दशकात, भारताने अत्यंत खडतर अशा आव्हानांचा सामना केला, त्यातील एक प्रमुख आव्हान म्हणजे अन्नटंचाई. ६० च्या दशकाच्या सुरुवातीला, देशावर दुष्काळाचे काळे सावट पसरले होते. त्यावेळी प्रा. स्वामिनाथन यांची, अढळ बांधिलकी आणि दूरदृष्टी यामुळे देशात कृषी समृद्धीचा नवा अध्याय सुरू झाला. कृषी क्षेत्रातील विशेषतः गहू विषयक संशोधन हे त्यांचे दिशादर्शक कार्य होते. त्यांनी गव्हाची नवी सुधारित वाणे विकसित केली. या त्यांच्या अग्रगण्य कार्यामुळे गव्हाच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झाली, अशाप्रकारे अन्नटंचाई असलेल्या भारताला त्यांनी अन्नधान्याच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण राष्ट्र बनवले. या अत्यंत महत्वाच्या कामगिरीमुळे त्यांना “भारतीय हरित क्रांतीचे जनक” अशी उपाधी मिळाली." असे त्यांनी सांगितले.
डॉ स्वामिनाथन यांचे कार्य प्रेरणादायी: कुलगुरू डॉ. के. प्रथापन
|