बातम्या

‘सतेज मॅथ्स स्कॉलर’ मुळे अभियांत्रिकीचा पाया भक्कम होईल:तेजस पाटील

Due to Satej Maths Scholar


By nisha patil - 6/27/2023 7:11:55 PM
Share This News:



कोल्हापूर :  प्रतिनिधी ‘सतेज मॅथ्स स्कॉलर’ परीक्षेमुळे विद्यार्थ्यांच्या मनातील गणिताची भीती कमी होईल व अभियांत्रिकी शिक्षणामध्ये त्याचा  नक्कीच फायदा होईल असा विश्वास डी.वाय पाटील ग्रुपचे विश्वस्त तेजस सतेज पाटील यांनी व्यक्त केला. साळोखेनगर येथील डी. वाय.पाटील इंजिनिअरिंग कॉलेजतर्फे आयोजित ‘सतेज मॅथ्स स्कॉलर’  परीक्षेतेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. 
 

या परीक्षेला राज्यभरातून सुमारे 2 हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. या परीक्षेतील प्राविण्यप्राप्त विध्यार्थ्यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन तेजस पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
 

यावेळी बोलताना तेजस पाटील म्हणाले, गणित विषयाला व्यवहारात अनन्य साधारण महत्व असून गणित हा विषय अभियांत्रिकी शिक्षणासाठी अतिशय महत्वाचा आहे. मात्र विद्यार्थ्यांमध्ये गणिताविषयी भिती असून त्यांच्या मनात त्या विषयासंबधी न्यूनगंड निर्माण होऊन या विषयात मुले कमी पडताना दिसतात. त्यांच्या मनावरील गणित विषयाची अनास्था कमी व्हावी, त्याविषयी गोडी निर्माण व्हावी व त्यांना प्रोत्साहन मिळावे. यासाठी या परिक्षेचे आयोजन केले होते. या परिक्षेमुळे विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शिक्षणामध्ये नक्की फायदा होईल.
यावेळी साळोखेनगर कॅम्पसचे संचालक डॉ. अभिजित माने उपस्थित होते, त्यांनी कॉलेजमध्ये वर्षभर घेण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होण्याकरता सतेज मॅथ्स परीक्षेसारखे उपक्रम नक्कीच लाभदायी ठरतील भविष्यातही असे उपक्रम राबविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
या परीक्षेमध्ये धीरज पाटील व ओम पाटील यांनी प्रथम क्रमांक, श्वेता पाटील व विघ्नेश जाधव यांना दोन, तर राजनंदिनी पाटील व अनुजा खंडाळे यांनी तृतीय क्रमांक मिळवला, त्यांना अनुक्रमे २५ हजार, १५ हजार व १० हजार रुपये अशी बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.श्वेता खंडागळे यांनी केले.
यावेळी प्राचार्य डॉ. सुरेश माने,प्रशासकीय अधिकारी सुयोग पाटील, ऍडमिशन हेड प्रवीण देसाई,सर्व विभाग प्रमुख, ऍडमिशन समन्वयक, प्राध्यापक ,शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी आदी उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.


‘सतेज मॅथ्स स्कॉलर’ मुळे अभियांत्रिकीचा पाया भक्कम होईल:तेजस पाटील