बातम्या

शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांची 106 वी जयंती उत्साहात साजरी.

Education Maharishi Dr Bapuji Salunkhe 106th birth anniversary was celebrated with enthusiasm


By nisha patil - 10/6/2024 3:10:51 PM
Share This News:



“कोणत्याही राष्ट्राचे भविष्य हे शैक्षणिक विचारावर अवलंबून असते.  आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक विचारांची प्रक्रिया शिक्षणातून उभी राहात असते. प्रत्येक कर्तृत्ववान व्यक्तीमागे एक शिक्षक असतो. त्यामुळे शिक्षकांनी आपली कर्तव्ये जपली पाहिजेत. नवीन शैक्षणिक धोरणाची योग्य अंमलबजावणी केल्यास कौशल्याधारित विद्यार्थी घडविता येतो. नवीन शैक्षणिक धोरणात सर्वांना शिक्षण, कौशल्याधारित शिक्षण, गुणवत्तापूर्ण, परवडणारे शिक्षण आणि समाजाप्रती उत्तरदायित्वाची भावना या गोष्टी महत्वाच्या असतात.

शिक्षकाने वेळापत्रकात न अडकता सदैव विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी तत्पर असायला हवे. स्वाभिमान हा माणसाला संघर्षातून व सत्कर्मातून मिळत असतो. मन, बुध्दी आणि शरीर एकत्र आल्याशिवाय प्रभावी शिक्षण होत नाही. शिक्षकांनी अध्यापनात प्रयोगशीलता जपली पाहिजे.  शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या  विचारांचा वारसा मोठा आहे. महाराष्ट्राला वैचारिक वळण देण्याचे काम शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे आणि श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेने केले आहे. बापूजींचा विचार शिक्षकांनी अध्यापनात उतरवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.  असे प्रतिपादन अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा, वाबळेवाडीचे जनक आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जालिंदरनगर, ता. खेड, जि. पुणे चे मुख्याध्यापक श्री दत्तात्रय वारे (गुरुजी)  यांनी केले. ते शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या 106 व्या जयंती प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून “ नवीन शैक्षणिक धोरण  आणि  शिक्षकांची भूमिका ” या विषयावर बोलत होते.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  संस्थेचे कार्याध्यक्ष मा.प्राचार्य अभयकुमार साळुंखे हे होते.  यावेळी संस्था उपाध्यक्ष मा.नामदेवराव कांबळे, सेक्रेटरी मा.प्राचार्या सौ. शुभांगी गावडे, संस्था सहसचिव (प्रशासन) मा. प्राचार्य डॉ. आर. व्ही. शेजवळ, संस्था सहसचिव (अर्थ) मा. एस. एम. गवळी, संस्थेचे सीईओ मा.कौस्तुभ गावडे, कोल्हापूर जिल्हा विभाग प्रमुख मा. श्रीराम साळुंखे,  प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे, प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. 

अध्यक्षीय भाषणात बोलताना संस्थेचे कार्याध्यक्ष मा.प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी  शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी बहुजन समाजाला शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची उभारणी केली. शिक्षणातील संधी आणि आव्हाने ओळखून बापूजींनी कार्य केले. या शिक्षणयज्ञात बापूजींनी अव्याहतपणे कार्य केले. विद्यार्थ्याला घडविणे हे प्रत्येक शिक्षकाचे उद्दिष्टय असायला हवे. विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास कसा होईल यासाठी शिक्षकांनी सदैव तत्पर असले पाहिजे.  अध्यापनात चिंतन, मनन याचबरोबर मनाची घुसळण गरजेची असते.  या जयंती दिनाच्या निमित्ताने शिक्षकांनी बापूजींच्या विचार व कार्याचा वारसा आत्मसात करुन विद्यार्थी घडवावेत व संस्थेचा नावलौकिक वाढवावा.  असे प्रतिपादन केले. 

याप्रसंगी मान्यवरांनी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या समाधीला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने झाली. श्री. महेश हिरेमठ व सहकाऱ्यांनी संस्था प्रार्थना व सुमधूर भक्तीगीते सादर केली. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सहसचिव (प्रशासन) मा. प्राचार्य डॉ. आर. व्ही. शेजवळ यांनी केले. पाहुण्यांची ओळख  संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.कौस्तुभ गावडे यांनी करुन दिली. आभार संस्थेचे सहसचिव (अर्थ)  मा. एस. एम. गवळी यांनी मानले.  सुत्रसंचालन प्रा.डॉ.कविता तिवडे व प्रा.गीतांजली साळुंखे यांनी केले.

दुपारच्या सत्रात मुख्याध्यापकांसाठी चर्चासत्र संपन्न झाले.  कार्यक्रमाचे संयोजन संस्थेतील व विवेकानंद कॉलेजमधील गुरुदेव कार्यकर्त्यांनी केले. या कार्यक्रमास संस्थेचे आजी-माजी पदाधिकारी व संस्थेच्या सर्व शाखांतील बहुसंख्य गुरुदेव कार्यकर्ते, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.  
 


शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांची 106 वी जयंती उत्साहात साजरी.