बातम्या

शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांची 9 जून 2024 रोजी जयंती. या निमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला थोडक्यात आढावा.

Education Maharishi Dr Birth anniversary of Bapuji Salunkhe on 9 June 2024 A brief review of his work on this occasion


By nisha patil - 5/6/2024 5:04:26 PM
Share This News:



शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे  यांनी श्री स्वामी विवेकानंद  शिक्षण संस्थेच्या रूपाने महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या अलौकिक कार्याचे स्मरण सर्वांना व्हावे म्हणून दर वर्षी 9 जून हा दिवस शिक्षण महर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांचा जयंतीदिन म्हणून अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो. 

 या निमित्ताने महाराष्ट्रभर पसरलेल्या संस्थेच्या विविध ज्ञानमंदिरातून गुरुदेव कार्यकर्ते संस्थेमध्ये येऊन शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या समाधीचे दर्शन घेतात आणि ज्ञानदानाचे पवित्र कार्य करण्यासाठी सकारात्मक उर्जा घेऊन नव्या उमेदीने परत आपापल्या शाखेवर जातात. या प्रसंगी संस्थेच्या सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांसाठी शैक्षणिक, सामाजिक व अध्यात्मिक क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींची व्याख्याने आयोजित केली जातात. बापूजी धार्मिक वृत्तीचे असल्याने भगवद्गीता व ज्ञानेश्वरी हे त्यांचे आवडते ग्रंथ होते. महाराष्ट्राला संतांची परंपरा आहे. संत साहित्याचा बापूजींच्या जीवनावर खूपच प्रभाव होता.  त्यामुळेच शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या या 106 व्या जयंती दिना निमित्त्‍ दि. 9 जून 2024 रोजी सकाळी 10.30 वा.  प्रमुख पाहुणे मा. श्री. दत्तात्रय बाबुराव वारे (गुरुजी)  यांचे  ‘ नवीन शिक्षण धोरण आणि शिक्षकांची भूमिका   या विषयावर व्याख्यान आयोजित करणेत आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्याध्यक्ष मा.प्राचार्य अभयकुमार साळुंखे  हे आहेत. 

भगवद् गीता सांगते माणूस जन्माने मोठा नसून कर्माने मोठा होतो. माणसाने जीवनात चांगले कर्म केल्याने त्याला समाजात मोठेपणा प्राप्त होतो. समाजकार्याला फारच थोडी माणसे वाहून घेतात आणि दीर्घकाळ सर्वांच्या स्मरणात राहतात. असेच एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. बापूजी साळुंखे.  दीन दलित व बहुजन समाजातील मुला मुलींचा सर्वांगीण विकास व्हावा , विद्यार्थी स्वावलंबी व सुसंस्कारी बनावे, त्यांनी स्वतःच्या विकासाबरोबरच समाज व देशाच्या प्रगतीस हातभार लावावा ज्ञानवंत व गुणवंत असे विद्यार्थी घडवणे हे बापूजींचे ध्येय होते आणि ते ध्येय पूर्ण करण्यासाठीच शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना केली. आज महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात मिळून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या जवळपास 406 शाखांद्वारे दहा लाख विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे धडे देऊन विद्यार्थी घडवण्याचे कार्य अखंडपणे सुरू आहे व त्याचेच फलित म्हणून आज पर्यंतच्या 70 वर्षांच्या कालावधीत या संस्थेच्या विविध शाखातून शिकलेले विद्यार्थी आज देशाच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातच नव्हे तर परदेशातही मोलाची कामगिरी करीत आहेत व संस्थेचे नाव उज्वल करीत आहेत. त्यामुळेच आज ही शिक्षणसंस्था महाराष्ट्रातील एक नामंकित व गुणवंत शिक्षणसंस्था होत आहे.

अगदी साधे वागणे व बोलणे हे बापूजींचे वैशिष्ट्य आहे.  मुद्दाम म्हणून आपल्या सत्तेची व अधिकाराची दुसऱ्यावर छाप पाडणे किंवा आपण कोणीतरी थोर व्यक्ती आहोत असा बडेजाव करणे त्यांना कधीच आवडले नाही. त्यांच्या या साधेपणामुळे सामान्य कार्यकर्तेही त्यांच्यासोबत अगदी निर्मळ मनाने वावरत असत. अंगीकृत कार्य मनापासून व न कंटाळता प्रामाणिकपणे करणे हीच खरी ईश्वर सेवा आहे ही त्यांची मनोधारणा होती. रोजचे काम रोज पूर्ण करण्याकडे त्यांचा नेहमी कटाक्ष असायचा .

त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत निष्ठावान गुरुदेव कार्यकर्त्यांच्या साथीने महाराष्ट्राच्या उस्मानाबाद ,पुणे ,सातारा ,रायगड कोल्हापूर, सोलापूर सांगली ,रत्नागिरी, सिंधुदुर्ग ,पेण, बेळगाव अशा जिल्ह्यांमध्ये ज्ञान मंदिरे उघडून येथील सर्वसामान्य जनतेच्या शिक्षणाची सोय केली. हे सर्व करीत असताना त्यांच्या नशिबी मान-अपमान, कष्ट, उपासमार हे सर्व आले पण त्यांनी कोणत्याही परिस्थितीत आपली शिक्षणाची गंगा दारोदारी पोहोचविण्याचे कार्य बंद पडू दिले नाही.

त्यामुळेच आज महाराष्ट्राच्या शैक्षणिक जडणघडणीत बापूजींचे योगदान महत्त्वपूर्ण आहे . आजच्या युवा पिढीला बापूजींच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू मार्गदर्शक ठरू शकतील. सत्य, प्रामाणिकपणा, सेवा आणि त्याग पिळवणूक प्रवृत्तीस आळा या मौलिक निष्ठा जीवनात उतरवण्यासाठी सुसंस्कारी शिक्षण घेतले पाहिजे . आपले आचार विचार व उच्चार हे पवित्र असले पाहिजेत असे त्यांना वाटे.

बापूजीनी केलेल्या शिक्षण प्रसाराच्या कार्याचा गौरव म्हणून शासन व विविध संस्था यांनी बापूजींना मानपत्र दिले. महाराष्ट्र शासनातर्फे 'दलित मित्र' म्हणून त्यांना गौरवण्यात आले शिवाजी विद्यापीठाकडून 'डी.लीट ' ही पदवी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.  बापूजींच्या शैक्षणिक कार्याची नोंद घेऊन शासनानेही त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करावा अशी अनेक गुरुदेव कार्यकर्त्यांची मनस्वी इच्छा आहे.

संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे , संस्थेच्या सचिव मा. प्राचार्या सौ शुभांगी मुरलीधर गावडे व संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कौस्तुभ गावडे हे  सर्व  संस्थेच्या शैक्षणिक विकासासाठी सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांसमवेत संस्था अधिकाधिक प्रगतीपथावर नेण्यासाठी कार्यरत आहेत.संस्थेतील सर्व जाती धर्मातील गुरुदेव कार्यकर्त्यांना बापूजींनी आपले म्हणून एखाद्या कुटुंब प्रमुखाप्रमाणे सर्वांची काळजी घेतली होती. त्यामुळे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांचा मिळून एक मोठा संस्था परिवार निर्माण झाला आहे व या परिवाराचे श्रद्धास्थान म्हणून शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांना प्रत्येकाच्या हृदयात एक मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. आज त्यांच्या या जयंतीदिनी माझे विनम्र अभिवादन.


शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांची 9 जून 2024 रोजी जयंती. या निमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला थोडक्यात आढावा.