बातम्या
कृषीविषयक योजना शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहचवा - राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल
By nisha patil - 9/1/2025 12:26:07 PM
Share This News:
केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या कृषी विभागाशी संबंधित विविध योजना आहेत. या योजना शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहचवा असे निर्देश वित्त व नियोजन, कृषी विभागाचे राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी दिले. राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात कृषी व नियोजन विभागाची आढावा बैठक घेण्यात आली.
राज्यमंत्री ॲड. जयस्वाल म्हणाले, शेतकऱ्यांच्या शेतमालाला बाजारपेठ मिळाली पाहिजे. शेतीमध्ये उत्पादनवाढीसाठी शासनस्तरावरून आवश्यक ती मदत करण्यात येईल. पानमळ्याच्या शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी विभागाकडून नवीन योजना राबवण्यात यावी.राज्यात कृषी क्षेत्रात लक्ष केंद्रीत कार्यपद्धतीने काम करण्याची गरज असून पीक पद्धतीनुसार उद्दिष्ट ठरवले पाहिजे. पडीक शेतीच्या प्रश्नसंबंधी कोणत्या उपाययोजना करता येतील व त्याची अंमलबजावणी कशी करता येईल यासंबधी बैठकीत चर्चा करण्यात आली.
नियोजन विभागामार्फत राज्य आणि जिल्हा पातळीवर पंचवार्षिक योजना आणि वार्षिक योजनांचा आढावा घेऊन प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही याप्रसंगी त्यांनी दिले.नियोजन व कृषी विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती या बैठकीत सादर करण्यात आली.या बैठकीस कृषी व नियोजन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कृषीविषयक योजना शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहचवा - राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल
|