बातम्या

छत्रपती राजाराम कारखान्याला आमदार सतेज पाटील यांचा आठ दिवसाचा अल्टिमेटम

Eight day ultimatum of MLA Satej Patil to Chhatrapati Rajaram factory


By nisha patil - 2/1/2024 6:54:57 PM
Share This News:



छत्रपती राजाराम कारखान्याला आमदार सतेज पाटील यांचा आठ दिवसाचा अल्टिमेटम;

अन्यथा कारखान्यावर धडक देणार.  आमदार सतेज पाटील यांचा इशारा...

छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याने सभासदांचा ऊस येत्या आठ दिवसात नाही नेल्यास, आपण स्वतः राजाराम कारखान्यावर धडक देणार असल्याचा इशारा आमदार सतेज पाटील यांनी दिला.  सभासदांचा ऊस वेळेत नेला जात नसल्याने आज राजाराम कारखान्याच्या सभासदांचा मोर्चा आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली साखर सहसंचालक कार्यालयावर काढण्यात आला. यावेळी आमदार सतेज पाटील बोलत होते. ऊस न नेण्यामागे, सभासदत्व रद्द करण्याचे षडयंत्र सुरू असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. 


 राजाराम कारखान्याकडून ऊस उत्पादक सभासदांचा ऊस वेळेत नेला जात नसल्याने आज मंगळवारी राजाराम कारखान्याच्या सभासदांनी कारखान्याच्या कारभाराचा निषेध करत साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढला.  
आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीतील विठ्ठल मंदिरापासून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली. सहकार कायद्यानुसार सभासदांच्या उसाची वेळेत तोडणी करणे हे  कारखान्यावर बंधनकारक आहे. मात्र सभासदांचा ऊस वेळेत नेला जात नाही. ऊस न नेण्यामागे, सभासदत्व रद्द करण्याचे षडयंत्र सुरू असल्याचा आरोप यावेळी आमदार सतेज पाटील यांनी केला.  लोकशाहीमध्ये मतदान कोणाला करायचं हा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र विरोधातील सभासदांचा ऊस न्यायचा नाही हे राजकारण सुरू आहे. मात्र आता मागे हटणार नसून कारखान्याच्या चुकीच्या कारभाराविरोधात आपली न्यायालयीन लढाई सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. आपण स्वतः आता पर्यंत कधी राजाराम कारखान्यांमध्ये गेलो नाही. मात्र जर सभासदांच्या वर अन्याय होत असेल तर आपण स्वतः राजाराम कारखान्यावर जाणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितल. 

     

दरम्यान, ऊस नोंदणीचे करार कारखान्यांकडून गायब केले जात आहेत. त्यामुळं ज्यांनी नोंदी घातल्या आहेत त्याची एक प्रत अजिंक्यतारा कार्यालय किंवा श्री राम सोसायटी येथे आणून द्यावी. असं आवाहनही यावेळी आमदार पाटील यांनी केलं. एकीकडे कारखान्यामध्ये को जनरेशन उभा करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, सभासदांचा ऊस नेला जात नाही. को जनरेशन करायचे आहे तर त्या विद्वानाने प्रथम ऊस गळप केला पाहिजे, इतकी  विद्वता हवी, अशी टिकाही त्यांनी कारखान्याचे चेअरमन अमल महाडिक यांच्यावर नाव न घेता केली.

 

 दरम्यान, यावेळी राजाराम कारखान्याचे माजी चेअरमन सर्जेराव माने यांनी, कारखान्याचे एक अण्णाजी गॉड फादर मंत्री मंडळात बसले आहेत त्यांचे फोन खाली येतात. आणि अधिकाऱ्यांच्या वर दबाव आणला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. सभासद कारखान्याचे मालक आहेत. हे त्यांनी आता विसरलय. प्रत्येक गावात तोड द्यायचे नाही अशा पद्धतीने अन्याय सुरू आहे.. महादेवराव महाडिक यांचे वारस माजी आमदार अमल महाडिक कारखान्याचे चेअरमन झाले आहेत. मात्र या वारसांना काही कळत नाही असा टोलाही सर्जेराव माने यांनी लगावला. दिनकर पाटील यांनी, एका सभासदाने आमदार सतेज पाटील यांच्या हातात हात दिला म्हणून त्याचा ऊस अद्यापही नेला नसल्याचं सांगीतल. किरण भोसले यांनी, हा लढा कायद्याने लढू मात्र वेळ पडली की पायातील हातात घ्यायला कमी पडू नका. असं आवाहन केलं. बंडोपंत सावंत यांनी, निवडणुकीच्या काळात आमदार सतेज पाटील यांच्या पाठीशी राहणाऱ्या सभासदांच्या नावासमोर शेरा मारून त्रास देण्याचं काम सुरू आहे. त्यांची दबावशाही मोडून काढण्याची गरज आहे त्यासाठी एक होऊया. असं आवाहन केलं..महेश चव्हाण यांनी, बाजूच्या शेतकऱ्याचा ऊस नेला जातो.. मात्र विरोधातील सभासदाचा ऊस नेला जात नाही.. सगळ्या जिल्ह्यात राजाराम कारखान्याचा दर कमी आहे.

राजकारणासाठी तोड देणार नाही ही भूमिका योग्य नसल्याची टिका त्यांनी केली. प्रशांत पाटील  यांनी, राजाराम कारखान्याच्या विरोधात आज मोर्चा काढलाय यापुढे उग्र आंदोलन करू . बाहेरील ऊस आणला जातोय . मात्र बाहेरची मूल दत्तक घेण्याऐवजी आपलीच मुल सांभाळा. असा टोला त्यांनी लगावला.मोर्चा साखर सह संचालक कार्यालयावर आल्यानंतर यावेळी साखर सहसंचालक जी जी मावळे यांना निवेदन देण्यात आल. विरोधी सभासदांच्या ऊसाला तोड मिळत नसल्याने यामध्ये शासन म्हणून साखर सहसंचालक यांनी हस्तक्षेप करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.  याबाबत राजाराम कारखाना प्रशासनाला लेखी कळविण्यात येणार असल्याचं आश्वासन जी जी.मावळे यांनी दिली. यावेळी पुलाची शिरोलीचे माजी सरपंच शशिकांत खवरे, माजी नगरसेवक मोहन सालपे, दिगंबर मेडशिंगे, हंबीरराव वळके, अभिजीत भंडारी, किरण भोसले, बाबुराव बेनाडे यांच्यासह राजाराम कारखान्याचे सभासद या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


छत्रपती राजाराम कारखान्याला आमदार सतेज पाटील यांचा आठ दिवसाचा अल्टिमेटम