बातम्या

कोल्हापूरवरचा गद्दारीचा डाग पुसण्यासाठी राजु लाटकर यांना निवडून द्या - सतेज पाटील

Elect Raju Latkar to erase the stain of betrayal on Kolhapur Satej Patil


By nisha patil - 12/11/2024 10:35:30 AM
Share This News:



कोल्हापूरवरचा गद्दारीचा डाग पुसण्यासाठी राजु लाटकर यांना निवडून द्या - सतेज पाटील

उत्तरेश्वर पेठेतील सभेला प्रचंड प्रतिसाद

कोल्हापूर: कोल्हापूर हे छत्रपती शाहू महाराजांचे पुरोगामी शहर म्हणून ओळखले जाते. ऐतिहासिक वारसा असलेल्या या शहरावर विरोधी उमेदवारामुळे गद्दारीचा डाग लागला आहे. सुरत गुवाहाटी मार्गे पळून जाणाऱ्या या गद्दारांमुळे अत्यंत दुर्दैवी इतिहास महाराष्ट्रात घडला. हा इतिहास बदलायचा असेल व कोल्हापूर शहरावर पडलेला गद्दारीचा डाग पुसायचा असेल तर येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला सामान्य कार्यकर्ता राजेश लाटकर यांना निवडून द्यावे लागेल असे मनोगत आ.सतेज पाटील यांनी व्यक्त केले. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील इंडिया आघाडी व महाविकास आघाडीचे काँग्रेस पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांच्या प्रचारार्थ उत्तरेश्वर पेठ येथे झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला संजय पवार, आर.के.पोवार, रवीकिरण इंगवले, सचिन चव्हाण, आम आदमी पार्टीचे संदीप देसाई, सरलाताई पाटील, पद्मजा तिवले हे प्रमुख उपस्थित होते. जनतेच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता येणार असून सत्ता आल्यावर महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना तीन हजार प्रतिमाह देण्यात येणार असल्याचे सांगून सतेज पाटील पुढे म्हणाले, महिला व मुलींसाठी बस प्रवास मोफत, प्रत्येकी पाचशे रुपयात सहा सिलेंडर, कृषी समृद्धी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे तीन लाख रुपये पर्यंत कर्ज माफी, नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांचे प्रोत्साहन, सुशिक्षित बेरोजगार तरुणांना दर महिन्याला चार हजार रुपये पर्यंतची मदत अशा योजना जाहीरनामेत समाविष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपच्या महायुती सरकारने महागाई वाढवण्याचे काम केले. हे सरकार घालवण्यासाठी राजेश लाटकर यांना मताधिक्याने निवडून द्या असे आवाहन आ.पाटील यांनी केले. राजू लाटकर हे तळागाळातील कार्यकर्ते असून त्यांना  परिस्थितीची जाण असून ते जनतेचे हिताची कामे करतील असे खा.श्रीमंत छत्रपती शाहू महाराज म्हणाले. दीड हजार रुपये देऊन सरकारने अडीच हजार रुपये काढून घेतले असे चुकीचे धोरण राबवणारे या सरकारला सत्तेतून घालवले पाहिजे असे ते पुढे म्हणाले.

जनतेचे हितासाठी खर्च करायला हरकत नाही पण त्यासाठी आर्थिक शस्त्र असावी लागते असा टोला त्यांनी सत्ताधारी नेत्यांना लगावला. कोल्हापुरातील विविध समस्या सोडवण्यासाठी राजू लाटकर सक्षमपणे कार्य करतील व जनतेने त्यांना भरभरून मतदान करावे असे आवाहन खा. शाहू महाराज यांनी केले. यावेळी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले लाटकर यांच्या नावामध्येच लाट आहे, जनतेच्या पाठबळावर ही लाट विरोधकांना उध्वस्त करून टाकेल. हिंदुत्व च्या नावाखाली खोटा प्रचार करणाऱ्या विरोधी उमेदवाराने भगव्याचा अपमान केला व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची फसवणूक केली. ही गद्दार प्रवृत्ती गाडण्यासाठी जनतेने राजेश लाटकर यांना मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले. प्रेशर कुकर आता घराघरात पोहोचले असून सर्वसामान्य कार्यकर्त्याला विजयी करून कोल्हापूरकर इतिहास घडवतील असे ते म्हणाले. यावेळी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त करुन लाटकर यांना पाठिंबा व्यक्त केला.

सभेला डी.जी.भास्कर, जयसिंगराव रायकर, रमेश पवार, अनिल माने, संभाजीराव जगदाळे, गिरीश कदम, शिरीष कदम, निरंजन कदम, प्रताप जाधव, सुजय पोतदार, श्रीधर गाडगीळ, सुरेश कदम, किशोर माने, रमाकांत आयरेकर, किरण पवार, जयसिंगराव साळोखे, दत्तात्रय मांडेकर, मदन भोसले, बंडोपंत सुतार, सर्जेराव टोपकर, प्रताप सुर्वे, पांडुरंग जाधव यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

राजेश लाटकर यांचे चिन्ह प्रेशर कुकर आहे. आपल्या घराघरात प्रेशर कुकर आहेत जे आपण रोज पाहतो. पण उत्तरेश्वर पेठेतील ही गर्दी पाहून विरोधी उमेदवाराचे 'प्रेशर' नक्की वाढणार असे सांगून संजय पवार  यांनी लाटकर विजयी होतील व त्यांच्या प्रेशर कुकरमधून कोल्हापूरच्या विकासाची शिट्टी जोरात वाजेल असे मनोगत व्यक्त करताच उपस्थित आणि टाळ्या वाजवून अनुमोदन दिले.


कोल्हापूरवरचा गद्दारीचा डाग पुसण्यासाठी राजु लाटकर यांना निवडून द्या - सतेज पाटील