बातम्या
वीज दरवाढ मागे घ्यावी : आमदार जयश्री जाधव
By surekha - 7/21/2023 4:38:22 PM
Share This News:
वीज दरवाढ मागे घ्यावी : आमदार जयश्री जाधव
कोल्हापूर : राज्य शासनाने वीज दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी आमदार जयश्री जाधव यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केली आहे.
सर्वसामान्य जनतेच्या अत्यंत महत्वाच्या वीज दरवाढीच्या समस्यकडे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या आमदार सदस्य जयश्री चंद्रकांत जाधव यांनी विधानसभेत तारांकीत प्रश्नद्वारे शासनाचे लक्ष वेधले आहे.
आमदार जयश्री जाधव म्हणाल्या, राज्य वीज नियामक आयोगाने माहे एप्रिल २०२३ मध्ये महावितरणला वीजदरवाढ करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार दिनांक १ एप्रिल २०२३ पासून वर्ष २०२३-२४ मध्ये वीज दरात २.९ टक्के व वर्ष २०२४-२५ मध्ये ५.६ टक्के वीज दरवाढ लागू करण्यात येणार आहे. सदर वीजदरवाढीमुळे सर्वसाधारण वीज ग्राहकांच्या वीजदरात सरासरी २९.६५ टक्के वाढ होणार असून, ही दरवाढ अन्यायकारक आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील वीजदर हा पूर्वीपासूनच सर्वाधिक आहे. आणि त्यात पुन्हा वीज दरवाढ म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी नाही.
वाढीव बिलांमुळे सर्वसामान्य नागरिकांना शॉक बसला आहे. सर्वसामान्य व मध्यमवर्गीय नागरिकांचे बजेट कोलमडले असून, भरमसाठ वीज बिलांमुळे नागरिकांवर डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने अन्यायकारक दरवाढ त्वरित मागे घ्यावी अशी मागणी आमदार जयश्री जाधव यांनी अधिवेशनात केले आहे.
वीज दरवाढ मागे घ्यावी : आमदार जयश्री जाधव
|