बातम्या

सौर ऊर्जेवर भर दिल्याने महावितरण आव्हानांसाठी सज्ज:श्री.लोकेश चंद्र

Emphasis on Solar Energy Ready for Mahadistribution Challenges


By nisha patil - 6/6/2024 9:40:03 PM
Share This News:



महावितरणकडून शेतीसाठी सौर ऊर्जेचा देशात सर्वाधिक वापर करण्यात येणार असून यामुळे भविष्यात शेतकऱ्यांना दिवसा शाश्वत वीज पुरवठा मिळणार असून औद्योगिक व वाणिज्यिक ग्राहकांवरील सबसिडीचा बोजा कमी होईल. स्वस्त सौर ऊर्जेमुळे वीज खरेदीच्या खर्चात मोठी बचत होऊन सर्वच वीज ग्राहकांचे वीज दर मर्यादित राखण्यात मदत होईल. सौर ऊर्जेचा वापर महावितरण साठी क्रांतिकारी ठरणार असून त्याच्या वापरामुळे भविष्यातील आव्हानांचा यशस्वीपणे मुकाबला करण्यासाठी महावितरण पूर्णपणे सज्ज आहे, अशी खात्री महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री.लोकेश चंद्र यांनी दिली. 

महावितरण कंपनीचा १९ वा वर्धापन दिन महावितरणचे मुख्यालय प्रकाशगड मुंबई  येथे उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री.लोकेश चंद्र बोलत होते. कार्यक्रमाला म.रा.वि.म.सूत्रधारी कंपनीचे  स्वतंत्र संचालक श्री. विश्वास पाठक, महावितरणचे संचालक (संचालन) श्री अरविंद भादिकर हे प्रामुख्याने उपस्थित होते. 

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून कृषी पंपांच्या सौर उर्जीकरणाला मोठी गती देण्यात येत आहे. औद्योगिक ग्राहकांसाठी स्वागत कक्ष, ग्राहकांना २४ तासांत वीज जोडणी, ग्राहक सेवेसाठी ऑनलाईनचा जास्तीत-जास्त वापर, योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर यामुळे ग्राहक सेवेत महावितरणने आपला दर्जा उंचावला आहे. ग्राहक समाधानासाठी हा दर्जा कायम राखावा असे आवाहन श्री. लोकेश चंद्र यांनी यावेळी केले.

पारेषण विरहित सौर कृषी पंप योजने अंतर्गत ८.५ लक्ष कृषीपंप शेतकऱ्यांना मिळणार असून भविष्यात वीज जोडणी साठी प्रकरणे प्रलंबित राहणार नाही. यासाठी मिशन मोड वर काम करण्याची गरज आहे. 'प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली' योजनेमुळे ग्राहकांना ३०० युनिट पर्यंत मोफत वीज उपलब्ध होईल. परिणामी अशा वर्गवारीतील ग्राहकांच्या सबसिडीचा बोजा कमी झाल्याने महावितरणला त्याचा फायदा होईल. याही योजनेच्या वापरासाठी कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना प्रोत्साहित करावे, असेही आवाहनही त्यांनी यावेळी केले.

महावितरणचे स्वतंत्र संचालक श्री. विश्वास पाठक म्हणाले की, राज्यातील सुमारे ३ कोटी ग्राहकांना वीज पुरवठा करणारी महावितरण ही देशातील सर्वोत्तम वीज वितरण कंपनी आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा ८ तास वीज पुरवठा तर करताच येईल त्याशिवाय महावितरणच्या सर्वच ग्राहकांना याचा दिलासा मिळणार आहे. तसेच आरडीएसएस योजनेमुळे वीज यंत्रणेचे सक्षमीकरण  होऊन  महावितरणला भविष्यात विजेची वाढती मागणी पूर्ण करणे शक्य होणार आहे. यंत्रणेचे सक्षमीकरण करताना स्पर्धेच्या युगात ग्राहक सेवेचा दर्जा नेहमी सर्वात्कृष्ट ठेवावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

महावितरणचे संचालक श्री. अरविंद भादिकर  यांनी प्रास्ताविक केले.  ते म्हणाले की, महावितरणने नेहमीच विविध योजनांच्या प्रभावी अमंलबजावणीतून देशात कायम अव्वल स्थान राखले आहे.  यापूर्वी भारनियमन, वीज तुटवडा सारख्या वेगवेळ्या आव्हानांवर महावितरणने यशस्वी मात केली आहे. वर्ष २०३० साठी नियोजन करताना कंपनीची आर्थिक स्थिरता चांगली असणे अत्यंत महत्वाचे  आहे. त्यादृष्टीने सौर ऊर्जेचा जास्तीत-जास्त वापर, स्मार्ट मीटरच्या माध्यमातून वसुलीवर परीणामकारक तोडगा, वीज यंत्रणेचे सक्षमीकरण व वीज हानी रोखण्यासाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी ही सर्व कामे करण्यात येत आहे. कंपनीची प्रगती अशीच कायम ठेवायची असेल तर ग्राहकांना केंद्रबिंदू मानून आपल्या सेवांचा दर्जा कायम राखला पाहिजे व त्यासाठी सर्वानीच कटिबद्ध राहण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.

कार्यक्रमात महावितरणच्या मयत कर्मचाऱ्यांच्या वारसाच्या मार्गदर्शनाकरिता मानव संसाधन विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी सायबर गुन्हे तज्ञ् श्री.संदीप गादिया यांचे विशेष व्याख्यान झाले.

कार्यक्रमाला महावितरणचे अभियंते, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणाली निमजे यांनी केले तर आभारदर्शन कंपनी सचिव अंजली गुडेकर यांनी केले.


सौर ऊर्जेवर भर दिल्याने महावितरण आव्हानांसाठी सज्ज:श्री.लोकेश चंद्र