बातम्या
करनूरमध्ये ऊस पिक चर्चासत्रास शेतकऱ्यांचा उत्सफुर्त प्रतिसाद
By nisha patil - 5/25/2024 4:32:06 PM
Share This News:
कागल,प्रतिनिधी. संशोधन केंद्रातील अद्यावत तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर पोचवण्यात शाहू साखर कारखाना अग्रेसर आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी झाला आहे. असे प्रतिपादन कर्नाटक राज्याचे माजी ऊर्जा राज्यमंत्री व शाहू साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक वीरकुमार पाटील यांनी केले.
करनूर(ता.कागल )येथे शाहू साखर कारखान्यामार्फत आयोजित ऊस पीक चर्चासत्र कार्यक्रमावेळी ते बोलत होते. या चर्चासत्रास करनूर सेंटर अंतर्गत शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
वीरकुमार पाटील पुढे म्हणाले,शाहूचे संस्थापक स्व.विक्रमसिंहराजे घाटगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली ऊस विकास योजनांचा धडक कार्यक्रम शाहूने यशस्वीपणे राबविला. त्यांच्या पश्चात शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी त्यामध्ये भर घातली आहे.याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे.
व्हीएसआयच्या शास्त्रज्ञ डॉ.प्रीती देशमुख म्हणाल्या,पुरेशी पूर्व मशागत,प्रमाणित बेणे व रोपांचा वापर,रुंद सरी पद्धत,माती परीक्षणानुसार तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली रासायनिक व सेंद्रिय खतांचा वापर,आवश्यकतेनुसार पाणी पुरवठा,वेळेत कीड व रोग नियंत्रण व वाफसा असताना ऊस तोडणी ही किफायतशीर ऊस शेतीची सप्तपदीआहे.रुंद सरी पद्धतीने ऊस लागवड केल्यास यांत्रिक पद्धतीने ऊस तोडणी करता येते. त्यामुळे मजुरांना अभावी ऊस तोडणीस होणारा विलंब टाळून ती वेळेत होते.
व्हीएसआयचे कीटक शास्त्रज्ञ डॉ गणेश कोटीगरे म्हणाले,ऊस पिकाच्या उत्पादनावर रोग व किडींचा विपरित परिणाम होतो.
विशेषतः गवताळ वाढ या रोगाचा प्रादुर्भाव काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात ऊस पिकावर होत आहे. त्याचा उत्पादनावरही विपरीत परिणाम होत आहे.गवताळ वाढीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रोग व कीडमुक्त बियाणे व रोपे वापरणे आवश्यक आहे. सुपर किंग नर्सरी तंत्राद्वारे शेतकऱ्यांनी स्वतः दर्जेदार रोपे तयार करावीत. रोगग्रस्त बेटे दिसताच ती काढून टाकावीत.या रोगासाठी प्रतिबंधात्मक प्रभावी उपाययोजना नाही.मात्र प्रसार कमी करण्यासाठी आंतरप्रवाही कीटकनाशकांचा तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वापर करावा.
स्वागत व प्रास्तविक शेती अधिकारी रमेश गंगाई यांनी केले.आभार ऊस विकास अधिकारी दिलीप जाधव यांनी मानले.
करनूरमध्ये ऊस पिक चर्चासत्रास शेतकऱ्यांचा उत्सफुर्त प्रतिसाद
|