बातम्या
डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूटमध्ये ‘उद्योजकता विकास कार्यक्रम’ संपन्न
By nisha patil - 3/19/2024 7:39:10 PM
Share This News:
कोल्हापूर : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी मध्ये तीन दिवसीय ‘उद्योजकता विकास कार्यक्रम’ संपन्न झाला. कार्यक्रमांमध्ये उद्योग क्षेत्रातील विविध तज्ञांनी विद्यार्थ्यांना उद्योजक बनण्यासाठी प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमांमध्ये अंतिम वर्ष पदविका अभियांत्रिकी मध्ये शिकणाऱ्या दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूटचे प्राचार्य विरेन भिर्डी व उद्योग क्षेत्रातील तज्ञ मान्यवरांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमांमध्ये तज्ञ म्हणून उपस्थित असलेले डॉ.अजय मस्के यांनी ‘स्टार्टअप इकोसिस्टीम’ बद्दल मार्गदर्शन करताना सामाजिक व आर्थिक दृष्टिकोनातून उद्योजकता विकास का महत्त्वाचे आहे हे सांगितले, तसेच स्वअनुभवातून उद्योग सुरू करण्यापासून यशस्वी होण्यापर्यंतच्या मार्गातील विविध अडथळ्यांबद्दल विस्तृत माहिती देत धैर्याने त्यातून कसे मार्ग काढायचे हे समजावून सांगितले. श्री मच्छिंद्र चौगुले यांनी ‘गव्हर्नमेंट स्कीम्स फॉर स्टार्टअपस’ या विषयावर बोलताना युवा उद्योजकांना केंद्र व राज्य शासनाकडून मिळणाऱ्या विविध स्कीम ची माहिती दिली व उद्योजक बनताना त्याचा फायदा कसा घेता येईल हे सांगितले. यासोबत त्यांनी आजच्या युवा पिढीने कृषी उद्योगाकडे सुद्धा एक उत्तम संधी म्हणून पाहिले पाहिजे असे प्रतिपादन केले. श्री प्रताप पाटील यांनी ‘इंटरप्रोनियल ट्रेट’ बद्दल मार्गदर्शन करताना एखादी व्यक्ती यशस्वी उद्योजक होण्यासाठी कोणते गुण आवश्यक आहेत याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच “यशस्वी उद्योजक होण्यासाठी तुमच्याकडे संयम, जोखीम घेण्याची ताकद, प्रचंड आत्मविश्वास व सकारात्मकता असेल तर यश हे नक्कीच मिळते” असे सांगितले. श्री विनय मगदूम यांनी ‘नेविगेटिंग चॅलेंजेस इन इंटरप्रोनरशिप’ या विषयावर मार्गदर्शन करताना उद्योग क्षेत्रात असलेल्या आव्हानांची माहिती दिली व त्या आव्हानांवर मात करत तुम्ही यशस्वी उद्योजक कसे बनू शकता याची माहिती दिली. उद्योजक बनण्यासाठी आत्मविश्वास,कष्ट करण्याची ताकद, सकारात्मकता व उत्तम संवाद कौशल्य याची आवश्यकता असल्याचे सांगितले.याप्रसंगी अभिप्राय देताना काही विद्यार्थ्यांनी कार्यक्रमातून उद्योजक बनण्यासाठी प्रेरणा मिळाली व कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिवा प्राचार्या . शुभांगीताई गावडे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कौस्तुभ गावडे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे नियोजन डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूटचे प्राचार्य विरेन भिर्डी यांनी केले. या कार्यक्रमासाठी कॉलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी प्रा. पी. टी. पानसरे व कोऑर्डिनेटर प्रा. जी. एस. साळोखे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ए. आर. चव्हाण यांनी केले.
डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूटमध्ये ‘उद्योजकता विकास कार्यक्रम’ संपन्न
|