बातम्या

शहाजी महाविद्यालयात पर्यावरण पूरक दसरा व रानभाज्या पाककृती स्पर्धा संपन्न

Environment friendly Dussehra and wild vegetable cooking competition concluded in Shahaji college


By nisha patil - 10/10/2024 7:57:16 PM
Share This News:



कोल्हापूर:दसरा चौक येथील श्री शाहू  छत्रपती शिक्षण संस्थेतील शहाजी छत्रपती महाविद्यालयात आज वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने पर्यावरण पूरक दसरा साजरा करण्यात आला.आपट्याच्या वनस्पतीची पाने न तोडता विद्यार्थ्यांनी टाकाऊ कागदांचा पुनर्वापर करून आपट्याच्या पानांचे आकार तयार केले. त्यावरती पर्यावरण पूरक दसऱ्याचे संदेश विद्यार्थ्यांनी दिले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी  विविध रानभाज्यांची पाककृती करून त्याची सादरीकरण केले. 25 सून अधिक पाककृती यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनींनी सादर केल्या.  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.के.शानेदिवाण, सोळांकुर कॉलेजचे वनस्पती विभाग प्रमुख डॉ. एस व्ही. मधाळे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.  पाककृती स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. 
   

महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागातील प्रा. सौ. अपर्णा मगदूम पाटील प्रा. एस.बी.चव्हाण, प्रा. श्रद्धा महाले, प्रा. पी एस कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आज महाविद्यालयात पर्यावरण पूरक दसरा साजरा करण्यात आला. पर्यावरण पूरक दसऱ्याचे महत्व यावेळीप्रा. अपर्णा मगदूम पाटील यांनी विषद केले. 
 

प्राचार्य डॉ.आर.के.शानेदिवाण म्हणाले,वनस्पतीची हानी न करता टाकाऊ वस्तु पासून, कागदापासून अत्यंत सुंदर असे पर्यावरण पूरक संदेश विद्यार्थ्यांनी आपट्याच्या पानाच्या कलाकृतीवरती केलेले आहेत. तसेच रानभाज्याच्या माध्यमातून सर्वांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी मदत होणार आहे.
डॉ.एस व्ही मधाळे म्हणाले, या रानभाज्या पूर्ण प्रदूषण मुक्त असून मानवी आरोग्याला खूप हितकारक आहेत. चांगल्या आरोग्यासाठी या रानभाज्यांचे नेहमी सेवन करावे. या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. 

 

या रानभाज्या पाककृतीमध्ये टाकाळयाची भाजी, कमळाच्या मुळांची भाजी, मोहर, कुर्डू, अंबाडा, केना, पाथर, घोसावळ,  करंदा यांच्या भाज्या आणि त्यांच्या पाककृतीची चव सर्वांनी घेतली.या पाककृती स्पर्धेत अनुराधा घाडगे यांनी प्रथम क्रमांक मिळवला .प्रज्ञा उन्हाळे यांनी द्वितीय क्रमांक मिळवला तर उत्कर्षा पाटील यांनी तृतीय क्रमांक पटकावला. या विजेत्यांना आणि स्पर्धेतील भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना रोख बक्षीस देऊन गौरवण्यात आले. 
 

स्वागत व प्रास्ताविक वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख अपर्णा पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. एस. बी. चव्हाण यांनी केले. प्रा. दीपा पाटील यांनी आभार मानले श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे यांचे या उपक्रमास प्रोत्साहन मिळाले. या पाककृती स्पर्धेस डॉ. आर.डी.मांडणकर डॉ.सुरेश शिखरे, डॉ. एन. एस. जाधव, प्रबंधक रवींद्र भोसले, अधीक्षक मनीष भोसले, ग्रंथपाल डॉ. पांडुरंग पाटील , प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या.


शहाजी महाविद्यालयात पर्यावरण पूरक दसरा व रानभाज्या पाककृती स्पर्धा संपन्न