बातम्या

कुपवाडा येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण

Equestrian statue of Shiv Chhatrapati unveiled by Chief Minister at Kupwara


By nisha patil - 7/11/2023 9:18:05 PM
Share This News:




 पर्वंतरांगापलिकडे असलेल्या पाकिस्तामनध्ये हा जयघोष पोहोचला पाहिजे, असे मुख्यमंत्र्याचे आवाहन 

 कुपवाडा येथे असलेले हे स्मारक जम्मू-काश्मीरला भेट देणाऱ्या देशातील लोकांसाठी एक प्रेरणास्थान बनेल
   जम्मू-काश्मीरमधी ल कुपवाडा येथे बसविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण आज मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, ‘आम्ही पुणेकर’ संस्थेचे विश्वस्त अभयसिंह शिरोळे, हेमंत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. 

‘आम्ही पुणेकर’ संस्था आणि ४१ राष्ट्रीय रायफल मराठा बटालियन यांच्या माध्यमातून हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यात आला आहे. 
भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना प्रेरणादायी, उर्जादायी ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. छत्रपतींचा हा पुतळा आपल्या देशाचा तिरंगा ध्वज शत्रूच्या छातीवर फडकवण्यासाठी नेहमीच जवानांना प्रेरणा देईल. त्यांचे मनोबल उंचावत राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

 मुख्यमंत्र्यांनी भाषणाची सुरूवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने केली. समोरच्या पर्वंतरांगापलिकडे असलेल्या पाकिस्तामनध्ये हा जयघोष पोहोचला पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. 
अश्वारुढ पुतळ्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पाकिस्तानच्या दिशेने बघत आहेत. त्यांच्या हातात तलवार आहे. महाराज येथे असल्याने शत्रू येथे पाऊल ठेवण्यास धजावणार नाही. हा पुतळा पाहून दहशतवादीही काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याची हिंमत करणार नाही. ज्या ठिकाणी हा पुतळा बसवला आहे त्या ठिकाणी काही दिवसांपूर्वी मोठा खड्डा पडला होता. तेव्हा जवानांनी सुमारे १८०० ट्रक माती भरून त्याठिकाणी पुतळ्यासाठी भक्कम पाया करण्यात आला. याचा उल्लेख करून मुख्यमंत्र्यांनी मराठा बटालियनच्या जवानांचे कौतुक केले. सातारा येथील मेजर संतोष महाडीक यांना अभिवादन करीत त्यांच्या बलिदानाची आठवण यावेळी त्यांनी सांगितली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त राज्य शासन आणि सांस्कृतिक विभागाने विविध उपक्रम राबवले. याच कालावधीत कुपवाड्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला याला मोठे महत्व आहे. याठिकाणी स्मारक करण्यात येत आहे. त्यासाठी आवश्यक ते सहकार्य राज्य शासन करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे भारतात आणण्याचा करार करण्यात आला असून ही अभिमानाची बाब आहे. वाघनखे राज्यात आणल्यानंतर ठिकठिकाणी दर्शनासाठी ठेवली जातील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


आज कुपवाडा येथे नव्या परंपरेला सुरूवात झाली असून यापुढे प्रत्येक वर्षी कुपवाडा येथे ७ नोव्हेंबरला ‘छत्रपती शिवाजी महाराज पर्व’ साजरे करण्यात यावे, असे आवाहन नायब राज्यपाल श्री. सिन्हा यांनी जवानांना केले. ‘स्वत:वर विश्वास ठेवा, मी नेहमी तुमच्या सोबत असेन’ शिवाजी महाराजांनी शूरवीरांना दिलेला हा संदेश मराठीतून वाचत श्री. सिन्हा यांनी विविध इतिहासकार आणि कवींनी लिहिलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम गाथांना उजाळा दिला. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावातच शक्ती, ऊर्जा आहे, असे सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले. दैनंदिन जीवनातील प्रत्येक समस्येवर मार्ग दाखविण्यासाठी शिवाजी महाराजांचे विचार दिशादर्शक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे भारतात आणण्यासाठी लंडनमध्ये करार करण्यात आला, राज्यासाठी ही अभिमानाची बाब असल्याचे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.


कुपवाडा येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण