बातम्या
ऑटोरिक्षा व मिटर्स टॅक्सी चालकांच्या कल्याणासाठी कल्याणकारी मंडळ स्थापन
By Administrator - 9/18/2024 10:14:23 PM
Share This News:
राज्यातील ऑटोरिक्षा व मिटर्स टॅक्सी चालकांच्या कल्याणाकरीता धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ स्थापन केले आहे. या कल्याणकारी मंडळाकडून केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ ऑटोरिक्षा व मिटर्स टॅक्सी चालकांना देण्यात येणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने जीवन विमा व अपंगत्त्व विमा योजना, आरोग्य विषयक लाभ, कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यास अर्थसहाय्य योजना (५० हजार रुपयापर्यंत), पाल्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना, कामगार कौशल्य वृध्दी योजना, इ. योजनांचा समावेश आहे. कार्यक्षेत्रातील ऑटोरिक्षा व मिटर्स टॅक्सी चालकांच्या कल्याणकारी मंडळाच्या नोंदणीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर येथे अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. सद्यस्थितीस नोंदणी अर्जाचे शुल्क, वार्षिक सदस्यत्वाचे शुल्क स्वीकारण्याची कार्यपध्दती राज्य स्तरावर निश्चित नसल्याने फक्त अर्जदाराचे अर्ज परिवहन कार्यालयाच्या स्तरावर स्वीकारण्यात येत आहेत, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी दिली आहे.
या कल्याणकारी मंडळाचे मुख्यालय मुंबई येथे असून जिल्ह्यातील ऑटोरिक्षा व मिटर्स टॅक्सी चालकांकरीता प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर स्तरावर जिल्हास्तरीय कल्याणकारी मंडळाची रचना करण्यात आली आहे. दिनांक 24 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व ऑटोरिक्षा व मिटर्स टॅक्सी चालकांसाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी मंडळाची कार्यपध्दती, कामकाज नियमावली निश्चित केली आहे.
ऑटोरिक्षा व मिटर्स टॅक्सी चालकांच्या कल्याणासाठी कल्याणकारी मंडळ स्थापन
|