बातम्या
शेंडा पार्क येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला 900 कोटींचा भरीव निधी देऊन प्रलंबित कामाला गती द्यावी - माजी आमदार अमल महाडिक यांची वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे मागणी
By nisha patil - 7/21/2023 8:19:00 PM
Share This News:
कोल्हापुरातील शेंडा पार्क येथे कार्यरत असलेले राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अद्यापही निधीच्या प्रतीक्षेत आहे. निधीअभावी अनेक इमारतींचे काम रखडले असून सर्वांचीच गैरसोय होत आहे. याकडे नूतन वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी माजी आमदार अमल महाडिक यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबरोबरच कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयातील गैरसोय आणि असुविधा दूर करण्यासाठी भरीव निधीची मागणी केली. आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी निधीची तरतूद करण्यात आली होती पण त्यानंतर या महाविद्यालयाच्या पूर्ततेसाठी कोणतीही भरीव तरतूद करण्यात आली नाही, ही बाब महाडिक यांनी मुश्रीफ यांच्या निदर्शनास आणून दिली.
छ. प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर येथील इमारतीची व अंतर्गत रस्त्यांची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी ४८४५.७५ लक्ष रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकिय मान्यता मिळणेबाबत मंत्रीमहोदयांनी शिफारस करावी असं अमल महाडिक यांनी सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे. छ. प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर हे ६६५ खाटांचे रुग्णालय आहे. या रुग्णालयात रत्नागिरी, सिंधुदुर्ग व कोल्हापूर या तीन जिल्हयातील रुग्ण उपचारासाठी येत असतात. रुग्णालयात दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णसेवा सुरळीत चालू राहण्यासाठी व रुग्णांवर योग्यप्रकारे उपचार होण्यासाठी रुग्णालयातील इमारतीची देखभाल व दुरुस्ती करणे आवश्यक आहे. जेणेकरुन रुग्ण सेवेमध्ये कोणत्याही प्रकारे बाधा येणार नाही. असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मौजे शिरोली पुलाची ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर येथे ट्रॉमा केअर सेंटर मंजूर होण्यासाठी शिफारस करण्याची मागणी अमल महाडिक यांनी निवेदनाद्वारे मंत्री महोदयांकडे केली आहे. शासनाने गोरगरीबांकरीता व सर्वसामान्य नागरिकांना मोफत उपचार मिळणेसाठी ठिक ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटर सुरू केले आहेत. कोल्हापूर जिल्हयातील मौजे शिरोली पुलाची ता. हातकणंगले हे गाव राष्ट्रीय महामार्गालगत असल्याने महामार्गावरील होणाऱ्या अपघातातील जखमींना तातडीने उपचार मिळावे व मनुष्य हानी टाळावी याकरीता राष्ट्रीय महामार्गालगत शिरोली पुलाची येथे ट्रॉमा केअर सेंटर सुरू होणे आवश्यक आहे. असं या निवेदनात म्हटले आहे.
कोल्हापूर येथे शासनामार्फत कर्करोग उपचार कक्ष (कॅन्सर सेंटर) सुरु करण्यात यावा. या मागणीचा प्रस्तावदेखील अमल महाडिक यांनी दिला आहे. कोल्हापूर जिल्हयात व आसपासच्या परिसरात कर्करोग रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. कोल्हापुरामध्ये विविध प्रकारच्या कर्करोगांवर उपचार होण्यासाठी शासकीय रुग्णालयात प्रभावी उपचार सेवा यंत्रणा उपलब्ध नसल्याने बहुसंख्य कर्करोग झालेल्या रुग्णांना खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागतात. खाजगी रुग्णालयात जाऊन सदरचे रुग्ण शासकीय योजनेतून उपचार करून घेतात. तथापी शासन स्तरावरून शासकीय जिल्हा रुग्णालयामध्ये अथवा स्वतंत्रपणे कर्करोग उपचार कक्ष सुरू केल्यास त्याचा लाभ रुग्णांसह शासकीय रुग्णालयांच्या वाढीसाठी होणार आहे. तसेच कर्करोग रुग्णांना प्रभावी उपचार पध्दतीचा लाभ होईल. असं या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याचबरोबर, रा. छ. शाहू महाराज शासकिय वैद्यकिय महाविद्यालय येथे १५० परिचारीकांकरीता वसतीगृह व वार्षिक १०० क्षमतेचे परिचारीका प्रशिक्षण केंद्र इमारतीचे बांधकाम, रा. छ. शाहू महाराज शासकिय वैद्यकिय महाविद्यालय येथे न्याय वैद्यक विभाग (फॉरेन्सीक ) इमारतीचे बांधकाम, रा. छ. शाहू महाराज शासकिय वैद्यकिय महाविद्यालय येथे ११०० खाटांचे रुग्णालय व ओपीडी इमारतीचे बांधकाम, रा. छ. शाहू महाराज शासकिय वैद्यकिय महाविद्यालय येथील अंतर्गत कॉक्रिट रस्ते व फुटपाथ, रा. छ. शाहू महाराज शासकिय वैद्यकिय महाविद्यालय येथे धर्मशाळा इमारत बांधणे, रा. छ. शाहू महाराज शासकिय वैद्यकिय महाविद्यालय येथे कॉमन पार्किंग शेड बांधणे, रा. छ. शाहू महाराज शासकिय वैद्यकिय महाविद्यालय येथे लँडस्केपींग व गार्डन तयार करणे इत्यादी मागण्या अमल महाडिक यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्या आहेत.
शेंडा पार्क येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला 900 कोटींचा भरीव निधी देऊन प्रलंबित कामाला गती द्यावी - माजी आमदार अमल महाडिक यांची वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे मागणी
|