बातम्या

नाशिक ड्रग्ज प्रकरणात माजी महापौराची पोलिसांकडून चौकशी

Ex mayor questioned by police in Nashik drug case


By nisha patil - 10/25/2023 10:32:52 PM
Share This News:



ड्रग्ज माफिया ललित पाटील याच्याशी अनेक बड्या राजकीय नेत्यांचा संपर्क असल्याचे आरोप प्रत्यारोप राजकीय वर्तुळात होत असताना अशातच नाशिक पोलिसांनी एका वाहन चालकाची चौकशी केली आहे. नाशिक शहरातील एका पक्षाच्या मोठ्या नेत्याचा हा वाहनचालक आहे. ललितच्या अपघातग्रस्त कारची दुरुस्ती करण्यासाठी संबंधित वाहनचालकाने मध्यस्थी केल्याचे समजते आहे. त्यामुळे नाशिकमधील माजी महापौर पोलिसांच्या रडारवर आले आहेत. 

ललित पाटील हा एमडी तस्करीत उतरण्यापूर्वी नाशिकमध्ये राजकीय क्षेत्रात कार्यरत होता. दोन राजकीय पक्षांमध्ये त्याने काम केले आहे तर जिल्ह्यातील बडे नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी त्या काळात शिवसेनेत प्रवेशही केला होता. याच मुद्द्यावर नाशिक शहर व जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी ललित सोबतच्या संबंधांच्या आरोप खोडून काढण्याचे प्रयत्न केले आहेत. यादरम्यान नाशिक शहर पोलिसांनी नाशिक शहरातील एका मोठ्या नेत्याच्या खाजगी वाहनचालकाची चौकशी केली. सन 2015 मध्ये ललितच्या सफारी कारचा अपघात झाला. ही कार सिडकोतल्या बडदे नगर येथील एका गॅरेजमध्ये तेव्हापासून पडून आहे. गॅरेज मालकाकडे चौकशी केल्यानंतर पोलीस एका वाहन चालकापर्यंत पोहोचले. हा वाहन चालक माजी महापौरांसाठी काम करत असल्याचं समोर आल्याने खळबळ उडाली आहे. 

बहुचर्चित ड्रग्जमाफिया ललित पाटील प्रकरणाची पाळेमुळे नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागापर्यंत पसरली असून मुंबई पोलिस पथकाने  देवळा तालुक्यातील सरस्वती वाडी येथून तब्बल 15 किलो ड्रग्ज हस्तगत केले. ललित पाटीलने पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा चालक सचिन वाघ याच्या मदतीने लोहोणेर येथे गिरणा नदीपात्रात ड्रग्जच्या 12 किलोच्या आठ बॅगा फेकल्याने त्याचाही शोध मंगळवारी पहाटे अडीच्या सुमारास मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी सुरु केला. दोन टप्प्यांत तब्बल 14 तास मोहीम राबवली. त्यानंतर आता नाशिकच्या एमडी ड्रग्जप्रकरणी गुन्हे शाखेकडून एका माजी महापौराची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती समजते आहे. ललित पाटीलची जुनी गाडी या नेत्याकडे होती. मात्र, प्रकरण अंगलट येत असल्याने ही गाडी रातोरात सात वर्ष जुनी दाखवली गेल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे संबंधित नेत्याचे धाबे दणाणले आहेत.


नाशिक ड्रग्ज प्रकरणात माजी महापौराची पोलिसांकडून चौकशी