बातम्या

पीक स्पर्धेसाठी प्रयोगशील शेतकऱ्यांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन

Experimental farmers are invited to submit applications for crop competition


By nisha patil - 11/7/2024 8:34:41 PM
Share This News:



राज्यात कृषी विभागामार्फत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतील खरीप हंगाम 2024 साठी जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी पीक स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अजय कुलकर्णी यांनी केले आहे.

 राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढून आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेवून राज्यांतर्गत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.

 

कृषी विभागामार्फत खरीप हंगाम सन 2024 मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडिद, सोयाबीन, भुईमुग, सूर्यफूल या ११ पिकांसाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

पीक स्पर्धेची ठळक वैशिष्टे व बाबी:

पीकस्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख मूग व उडिद पिकासाठी ३१ जुलै तसेच भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमूग व सुर्यफुल या पिकांसाठी ३१ ऑगस्ट आहे. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र सर्वसाधारण गटासाठी रक्कम रुपये ३०० व आदिवासी गटासाठी रक्कम रुपये १५० राहिल. स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. पीकस्पर्धेमध्ये सहभाग घेण्याकरिता स्पर्धकास स्वतःच्या शेतावर स्पर्धेकरिता सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या पिकाची यात भात पिकाच्या बाबतीत किमान २० आर व इतर पिकांच्या बाबतीत किमान ४० आर (१ एकर) क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. पीकस्पर्धा तालुकास्तरावर आयोजित करण्यात येणार असून सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरावरील पीकस्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरुन राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.

 अर्ज कोठे करावा व अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे-

विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र अ),   ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, ७/१२, ८ अ उतारा,  जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास), पीकस्पर्धेसाठी शेतकऱ्यांने संबधित ७/१२ वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा,  बँक खाते चेक पासबुकच्या पहिल्या पानांची छायांकित प्रत.

 

पीकस्पर्धा बक्षिसाचे स्वरुप-

सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकऱ्यांसाठी राज्य, जिल्हा व तालुका पातळीवरील पीकनिहाय प्रथम, व्दितीय क्रमांकाची बक्षीस रक्कम पुढीलप्रमाणे आहे.

 तालुका पातळीवर- प्रथम 5 हजार, व्दितीय- 3 हजार तर तृतीय - 2 हजार रुपये, जिल्हा पातळीवर - प्रथम 10 हजार, व्दितीय- 7 हजार तर तृतीय - 5 हजार रुपये व राज्य पातळीवर - प्रथम 50 हजार, व्दितीय- 40 हजार तर तृतीय - 30 हजार रुपये याप्रमाणे असणार आहे.

 

अधिक माहितीसाठी क्षेत्रीय स्तरावर कृषी सहाय्यक,  कृषी पर्यवेक्षक मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. खरीप हंगाम 2023 मध्ये पीकस्पर्धेसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. त्याप्रमाणे खरीप हंगाम सन 2024 पीकस्पर्धेसाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही श्री. कुलकर्णी यांनी केले आहे.


पीक स्पर्धेसाठी प्रयोगशील शेतकऱ्यांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन