बातम्या

शेतकऱ्यांनी शेतीबरोबरच संलग्न व्यवसाय करावा

Farmers should do allied business along with agriculture


By nisha patil - 9/10/2023 4:45:44 PM
Share This News:



-विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार यांचे आवाहन
-डी. वाय. पाटील कृषी विज्ञान केंद्रातर्फे कृषी तंत्रज्ञान सप्ताह 

कृषी क्षेत्राचा वेगाने विकास होत असून यामध्ये येणारे नवनवे तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यानी आपल्या आर्थिक उन्नतीसाठी शेतीबरोबर कृषी सलग्न व्यवसायही करावा असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार  यांनी केले.

   कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाची माहिती एकाच ठिकाणी मिळावी,  त्यासोबतच कृषी संलग्न व्यवसायांची प्रात्यक्षिक पाहण्यास मिळावी या हेतूने महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन आत्मा व कृषी विज्ञान केंद्र तळसंदे व डी. वाय पाटील फार्म यांच्या संयुक्त विद्यमाने चार दिवसीय कृषी तंत्रज्ञान सप्ताह तळसंदे येथे संपन्न झाला. 

   कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख, वरिष्ठ शास्त्रज्ञ जयवंत जगताप यानी ऊसाच्या विविध जाती, ऊस बेणे निवडताना घ्यावयाची काळजी, लागवडीतील अंतर, खत व्यवस्थापन, ड्रीपचे महत्त्व याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. पशुसंवर्धन विभागाचे विशेषज्ञ सुधीर सूर्यगंध यांनी जनावरांची योग्य निवड, लसीकरण, चारा व्यवस्थापन, गोठयातील स्वच्छता, जनावरातील रोग व त्याची काळजी कशी घ्यावी याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. दूध उत्पादनाबरोबर दुग्धजन्य पदार्थ तयार करून त्यातून शेतकऱ्यांनी अधिक फायदा घ्यावा असे आवाहन त्यानी केले.  सांगितले. गृह विज्ञान विभागाच्या विषय विशेषज्ञ दिपाली मस्के यानी  "फास्ट फूड" जमान्यात तृणधान्याचे महत्व  यावर मार्गदर्शन केले. उद्यानविद्या विभाग विषय विशेषज्ञ दीपक पाटील यानी भाजीपाला व फळ लागवडी बाबत  तर डॉ. निनाद वाघ यांनी  यानी  मातीचे आरोग्य व माती तपासणीचे महत्त्व याबद्दल मार्गदर्शन केले.

     यावेळी शेतकऱ्यांना डी. वाय. पाटील फार्म वरील विविध प्रकारच्या भाजीपाला, शोभिवंत झाडांची रोपवाटिका, फळ रोपवाटिका तसेच फार्मवरील आधुनिक तंत्रज्ञानाचा गोठा, हायड्रोपोनिक युनिट, गांडूळ खत, अझोला प्रकल्प आधुनिक हरितगृह, रोपवाटिका,फळ लागवड, नारळ बागेतील केळी व मसाला पिकांची लागवड, भाजीपाला लागवड तंत्रज्ञान त्याचबरोबर एकात्मिक कीड व रोग नियंत्रण बद्दल सविस्तर समक्ष प्लॉट वरती माहिती देण्यात आली. यावेळी फार्म हेड श्री अमोल गाताडे यांची सहकार्य लाभले. या चार दिवसीय कार्यक्रमासाठी हातकणगले, पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी व शिरोळ या तालुक्यातील १२००  हून अधिक शेतकऱ्यांनी लाभ घेतला. 

       या कार्यक्रमासाठी कृषी विभाग व आत्मा कोल्हापूर मधील श्री. अभिजीत गडदे, हातकणगले तालुका कृषी अधिकारी संदीप देसाई, राजगोंडा चौगुले, वसीम मुल्ला, सुनील कांबळे, विश्वजीत पाटील, सचिन कांबळे, श्री नंदकुमार मिसाळ, मंडल कृषी अधिकारी निलकुमार ऐतवडे, सर्व कृषी सहाय्यक व कृषी पर्यवेक्षक त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्र कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविका श्री. जयवंत जगताप यांनी केले आभार श्री राजवर्धन सावंत भोसले यांनी मानले. यावेळी वडगाव मंडल कृषी अधिकारी शेखर सुळगावकर उपस्थित होते.

तळसंदे: डी वाय पाटील फार्म येथे प्रक्षेत्र भेटीवेळी पिकांची माहिती घेताना महिला शेतकरी.

तळसंदे: कृषी तंत्रज्ञान सप्ताह मध्ये ऊस पीक तंत्रज्ञान बद्दल मार्गदर्शन करताना जयवंत जगताप, उपस्थित शेतकरी वर्ग


शेतकऱ्यांनी शेतीबरोबरच संलग्न व्यवसाय करावा