बातम्या
शिवाजी विद्यापीठात बारावीनंतर फिल्म मेकिंग कोर्स!
By nisha patil - 3/15/2024 12:25:13 PM
Share This News:
कोल्हापूर ः प्रतिनिधी शिवाजी विद्यापीठात प्रथमच बी. ए. फिल्म मेकिंग हा बारावीनंतरचा तीन वर्षांचा पूर्णवेळ अभ्यासक्रम सुरू होत आहे. चित्रपटांशी संबंधित असलेला कॅम्पसमधील हा पहिलाच अभ्यासक्रम असून, येत्या शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी होत आहे.
कोल्हापूरला चित्रपट क्षेत्राचा मोठा वारसा आहे. अनेक दिग्गज निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांनी देशाच्या चित्रपट सृष्टीत मोठे योगदान दिले आहे. तथापि, चित्रपट विषयाचे शास्त्रीय प्रशिक्षण आतापर्यंत उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना पुणे किंवा मुंबईला जावे लागत होते. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. दिगंबर शिर्के यांनी पुढाकार घेऊन चालू शैक्षणिक वर्षापासून चित्रपटविषयक अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार हा अभ्यासक्रम तयार झाला असून लवकरच त्याची अंमलबजावणी होत आहे. यामुळे विद्यापीठ कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांसोबत बाहेरील विद्यार्थ्यांना चित्रपटाचा शास्त्रीय अभ्यास करणे शक्य होणार आहे.
बारावी पास असलेल्या कोणत्याही विद्यार्थ्याला या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली असून थेअरी आणि प्रात्यक्षिकांवर आधारित हा अभ्यासक्रम आहे. चित्रपट जगताशी संबंधित तज्ज्ञांकडून अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. अत्यंत कमी शुल्कात विद्यार्थ्यांना पूर्णवेळ अभ्यासक्रम पूर्ण करता येणार आहे. शिवाय नियमानुसार वसतिगृहाची सुविधा मिळणार आहे. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणार्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागात संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केले आहे.
शिवाजी विद्यापीठात बारावीनंतर फिल्म मेकिंग कोर्स!
|