बातम्या

पायांच्या पंजावरून ओळखा तुम्ही किती ‘निरोगी’

Find out how healthy you are by your toes


By nisha patil - 3/20/2024 7:33:14 AM
Share This News:



 पायांच्या पंज्यांची अवस्था आरोग्याची माहिती देते, असे तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे पायाच्या पंजावर काही लक्षणे आढळून आल्यास ताबडतोब उपचार केले पाहिजेत. ही लक्षणे समजून घेतल्यास आपणास वेळेत उपचार करता येऊ शकतात. शिवाय पुढे होणारी शारीरीक हानी टाळता येईल. पंजावर आजारांची कोणकोणती लक्षणे दिसतात, याविषयी माहिती घेवूयात.
पंजावर पुरळ किंवा आखडणे हे मधुमेहामुळे होऊ शकते. पंज्यात आखडणे, आसपास संवेदना कमी होणे आणि लाल रंगाचे पुरळ ठीक न होणे ही  मधुमेहाची लक्षणे आहेत. यामुळे सारखी सारखी तहान लागणे, थकवा आणि वजन कमी होत असेल तर डॉक्टरांना दाखवा.

पंजाच्या बोटांवरील केस गायब होणे म्हणजे हृदयापासून पायाच्या बोटांपर्यंत रक्त योग्य प्रकारे प्रवाहित होत नाही. त्यामुळे त्या भागात केस येत नाहीत. हा रक्तप्रवाह किंवा नसांच्या संबंधित आजार असू शकतो. या लक्षणांशिवाय चालताना दुखत असेल तर डॉक्टरांकडे जावे. वेळेवर उपाय केल्यास ही समस्या दूर होऊ शकते. तसेच पंज्याच्या सांध्यात दुखत असल्यास हा रुमेटॉइड आर्थरायटिस असू शकतो. या आजारात हाता-पायांच्या छोट्या-छोट्या सांध्यांवर सर्वांत आधी परिणाम होतो. हिवाळ्यात या आजाराच्या रुग्णांना जास्त त्रास होतो. यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. प्राथमिक उपचार म्हणून या आजारात आराम देणारी औषधेही घेऊ शकता.

पंजे थंड पडणे हा हायपो-थायरॉइडिझमचा संकेत असू शकतो. हे थायरॉइड ग्रंथीच्या हार्मोन्सच्या कमतरतेमुळे होते. रेनॉउड्जच्या आजारात हाता-पायांच्या बोटांचे तापमान, तणाव, धूम्रपान आणि औषधांबाबत खूप संवेदनशील होऊन जातात. यामुळे थकवा, अंग दुखत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. रेनॉउड्स असेल तर गरम आणि थंड तापमानापासून दूर रहावे. आणखी एक लक्षण म्हणजे नखांच्या आकारात बदल होणे होय. रक्तातील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे नखांच्या आकारात बदल होतो. ही लक्षणे फुप्फुस, हृदय किंवा पोटाशी संबंधित समस्यांचीही असू शकतात. जर रंगात बदल झाला तर हा एक प्रकारचा त्वचा रोग सोरायसिस असू शकतो. हे लक्षण आढळून आल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.


पायांच्या पंजावरून ओळखा तुम्ही किती ‘निरोगी’