बातम्या

'जागर लोककलेचा' मधून लोककलांचे दर्शन

Folk art darshan from Jagar Lokkalecha


By nisha patil - 3/2/2024 1:02:33 PM
Share This News:



'जागर लोककलेचा' मधून लोककलांचे दर्शन

• जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते कलाकारांचा सन्मान

• पोवाडा, वासुदेव, भारुडाला प्रेक्षकांची टाळ्यांच्या गजरात दाद ; बहारदार लावणीने जिंकली कोल्हापूरकरांची मने

कोल्हापूर, दि. 2 (जिमाका: पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग आणि कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने श्री शाहू छत्रपती मिल येथे आयोजित महासंस्कृती महोत्सवात सादर झालेल्या 'जागर लोककलेचा' या कार्यक्रमातून महाराष्ट्रातील लोककलांचे दर्शन घडवण्यात आले. महोत्सवात सादर करण्यात आलेला पोवाडा, वासुदेव, झाडेपट्टी, लावणी, गवळण, पोतराज, भारुडाला प्रेक्षकांनी भरभरुन दाद दिली, तर बहारदार लावणीने कोल्हापूरकरांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते कलाकारांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक, अश्विनी जिरंगे, तहसीलदार सूर्यकांत पाटील, तहसीलदार स्वप्नील रावडे, नायब तहसीलदार नितीन धापसे- पाटील, उप अभियंता महेश कांजर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ, सहजसेवा ट्रस्टचे सन्मती मिरजे, प्रमोद पाटील, ऋषिकेश केसकर, उदय गायकवाड आदी उपस्थित होते.

जागर लोककलेचा कार्यक्रमात महाराष्ट्रातील लुप्त होत चाललेल्या कला सादर करण्यात आल्या. महाराष्ट्राचे लाडके शाहीर रामानंद उगले यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज व बाजीप्रभू देशपांडे यांच्या पोवड्यातून डोळ्यासमोर इतिहास उभा केला. पाहुण्या कलाकार श्रावणी महाजन यांनी गायलेली 'दही, दूध, लोणी..' ही गवळण व 'तुझ्या उसाला लागंल कोल्हा..' ही लावणी व 'खंडोबाची कारभारीण..' सह सादर केलेल्या गीतांना रसिक प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. सूत्रसंचालन चंद्रकांत पाटील यांनी केले.

दुपारच्या सत्राच्या सुरुवातीला शाहीर विजय जगताप संघ यांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या शिव- शाहूंच्या पोवाड्यांनी महाराष्ट्राचा इतिहास जागा केला. या पोवाड्यांना नागरिकांनी भरभरुन प्रतिसाद दिला.

महासंस्कृती महोत्सवात सादर होणारे कार्यक्रम -

दिनांक 3 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 4 ते सायं. 6 वाजेपर्यंत- मुद्राभद्राय राजते गाथा शिवशाहीची कार्यक्रम  व सायं. 6 ते 9 वाजेपर्यंत- गुढी महाराष्ट्राची कार्यक्रम 

दिनांक 4 फेब्रुवारी 2024 रोजी सायं. 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत - स्वराज्य संस्थापक (श्रीमंतयोगी) कार्यक्रम  होणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.

'जागर लोककलेचा' मधून लोककलांचे दर्शन