बातम्या

प्रश्नांच्या उत्तरांसाठी उमेदवारांनी मार्गदर्शक पुस्तिकेचे वाचन करावे – निवडणूक निरीक्षक, रोहित सिंह

For answers to the questions candidates should read the guidebook


By nisha patil - 4/24/2024 5:16:11 PM
Share This News:



 लोकसभा निवडणूक पहिल्यांदाच लढविण्यासाठी अर्ज भरलेल्या उमेदवारांनी तसेच इतर अनुभवी उमेदवारांनी निवडणूक प्रक्रियासंबंधिच्या विविध प्रश्नांसाठी उमेदवारांसाठी असलेल्या मार्गदर्शक पुस्तिकेचे वाचन करावे. त्यामध्येच आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील असे निवडणूक निरीक्षक 47 कोल्हापूर, रोहित सिंह यांनी उपस्थित उमेदवारांना सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात कोल्हापूर जिल्हयातील दोन्ही मतदार संघात निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवार तसेच त्यांच्या प्रतिनिधींना आदर्श आचारसंहिता पालन करण्यासाठी मार्गदर्शन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, निवडणूक निरीक्षक रोहित सिंह यांचेसह खर्च निरीक्षक चेतन आर.सी., हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे निवडणुक निरीक्षक संदीप नांदुरी, हातकणंगले निवडणुक खर्च निरीक्षक श्रीमती हरिशा वेलंकी, कोल्हापूर व हातकणंगले निवडणुक पोलीस निरीक्षक विवेकानंद शर्मा, निवडणूक निर्णय अधिकारी हातकणंगले संजय शिंदे यांचे सह खर्च, आचारसंहिता व माध्यम प्रमाणिकरण नोडल अधिकारी उपस्थित होते.

 यावेळी रोहित सिंह यांनी आपल्या काही तक्रारी असतील तर आम्हाला संपर्क साधा किंवा सी-व्हीजील मोबाईल ॲपवर तक्रार दाखल करा अशा सूचनाही दिल्या. यावेळी खर्च निरीक्षक हरिशा वेलंकी यांनी उमेदवारांच्या खर्चाच्या तपासणीबाबतच्या सूचना दिल्या. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आदर्श आचारसंहिता पालन करण्याचे आवाहन सर्व उपस्थितांना केले. यावेळी उपस्थित उमेदवारांना माध्यम प्रमाणिकरणाबाबतचे सादरीकरण नोडल अधिकारी माध्यम कक्ष तथा जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांनी केले तर आदर्श आचारसंहितेबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरूण जाधव, खर्च विषयक अतुल अकुर्डे अणि एक खिडकी योजनेबाबत राहूल रोकडे यांनी मार्गदर्शन केले. 

 

या मार्गदर्शन बैठकीमधे उपस्थित अपक्ष उमेदवार, विविध पक्षांच्या प्रतिनिधींनी त्यांना येत असलेल्या अडचणी तसेच प्रश्न मांडले. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी याबाबतच्या प्रश्नांची उत्तरे दिली. बैठकिचे प्रास्ताविक उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे यांनी केले.


प्रश्नांच्या उत्तरांसाठी उमेदवारांनी मार्गदर्शक पुस्तिकेचे वाचन करावे – निवडणूक निरीक्षक, रोहित सिंह