बातम्या
ऑक्सिजन उत्क्रांती प्रक्रियेसाठी डी. वाय. पाटील विद्यापीठाला पेटंट
By nisha patil - 11/7/2023 5:00:51 PM
Share This News:
ऑक्सिजन उत्क्रांती प्रक्रियेसाठी डी. वाय. पाटील विद्यापीठाला पेटंट
कोल्हापूर/ डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या आंतरविद्याशाखीय संशोधन केंद्राने शाश्वत ऊर्जा विकासाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. विद्यापीठाला ऑक्सिजन उत्क्रांती प्रक्रियेसाठी भारत सरकारकडून पेटंट जाहीर करण्यात आले. विद्यापीठाला मिळालेले हे 23 वे पेटंट आहे.
डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधकांनी सप्टेंबर 2022 मध्ये या पेटंटसाठी अर्ज केला होता. आठ महिन्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर 13 जून 2023 रोजी सदर पेटंट संशोधकांच्या नावे मंजूर करण्यात आले. या संशोधना अंतर्गत प्रमाणित नाविन्यपूर्ण ऊर्जा साठवणुकी व पाणी विघटनाची पद्धत पुढील वीस वर्षांसाठी डी वाय पाटील विद्यापीठाच्या नावे पेटंट स्वरूपात सुरक्षित केली गेली.
या संशोधनामध्ये प्रमुख संशोधक प्रा.सी.डी. लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधक विद्यार्थी रणजित पांडुरंग निकम आणि सोहेल बाबुलाल शेख या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. त्यांच्या नाविन्यपूर्ण दृष्टिकोनामुळे पाण्याच्या रेणूंमधून ऑक्सिजन वायू निर्मितीमध्ये कार्यक्षमता आणि परिणामकारकता वाढली आहे.
पाणी विघटनाची हि पद्धती शाश्वत ऊर्जा उपायांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल आहे. स्वच्छ आणि नूतनीकरणक्षम ऊर्जा स्त्रोतांच्या विकासासाठी यामुळे मदत मिळणार आहे. शाश्वत आणि पर्यावरणास अनुकूल ऊर्जा उत्पादनाची प्रक्रिया या संशोधनामुळे सुलभ होणार असून निरोगी भविष्यासाठीही हे यश उपयुक्त ठरणार आहे.
या कामगिरीबद्दल डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, अधिष्टाता डॉ. आर.के.शर्मा आणि कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी सर्व संशोधकांचे अभिनंदन केले.
ऑक्सिजन उत्क्रांती प्रक्रियेसाठी डी. वाय. पाटील विद्यापीठाला पेटंट
|