बातम्या

कोल्हापूर जिल्ह्यातील विविध रस्त्यांसाठी माजी आमदार अमल महाडिक यांची मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे 200 कोटींची मागणी

Former MLA Amal Mahadik demands 200 crores from minister Ravindra Chavan for various roads in Kolhapur district


By nisha patil - 8/2/2024 10:36:03 PM
Share This News:



 कोल्हापूर जिल्ह्यातील विविध रस्त्यांसाठी माजी आमदार अमल महाडिक यांची मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे 200 कोटींची मागणी

महायुतीचे सरकार राज्यात सत्तेत आल्यापासून कोल्हापूर जिल्ह्याला सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून तब्बल 1580 कोटी 87 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून पूर्णत्वाला गेलेल्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा आणि अन्य विकास कामांच्या भूमिपूजनासाठी मंत्री चव्हाण आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहावर झालेल्या कार्यक्रमात ऑनलाईन पद्धतीने विविध विकास कामांचा लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा पार पडला.

             

त्यानंतर मंत्री चव्हाण यांनी मा.आ.अमल महाडिक यांच्या शिरोली येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यासाठी भरघोस निधी दिल्याबद्दल  कोल्हापूरकरांच्या वतीने माजी आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते नामदार रवींद्र चव्हाण यांचा राजर्षी शाहूंची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.  कोल्हापूर जिल्ह्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात निधी दिल्याबद्दल रवींद्र चव्हाण यांचे त्यांनी आभार मानले. 

           

त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील विविध रस्त्यांसाठी आणखी 200 कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी त्यांनी केली. यामध्ये हातकणंगले,कोल्हापूर दक्षिण आणि करवीर विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाच्या रस्त्यांचा समावेश आहे.  विविध राज्यमार्ग,प्रमुख व इतर जिल्हा मार्ग आणि इतर रस्त्यांसाठी निधी देऊन कोल्हापूरच्या विकासाला गती द्यावी अशी मागणी अमल महाडिक यांनी केली.

          महाडिक यांनी मागणी केलेल्या रस्त्यांमध्ये प्रामुख्याने करवीर आणि हातकणंगले तालुक्यातील ग्रामीण भागांना राज्यमार्गाशी जोडणाऱ्या रस्त्यांचा समावेश आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांची रुंदी वाढवणे, उंची वाढवणे तसेच नवीन पूलांची उभारणी करणे अशा कामांचा समावेश आहे. महापुरामध्ये पाण्याखाली जाणाऱ्या रस्त्यांचा प्रामुख्याने विचार करून गावांचा तुटणारा संपर्क पुन्हा जोडला जाईल अशा रस्त्यांची उभारणी करावी अशी आग्रही मागणी अमल महाडिक यांनी केली. 

         

 त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्गापासून उजळाईवाडी विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण करण्याची आवश्यकता महाडिक यांनी बोलून दाखवली. कोल्हापूर शहराच्या प्रस्तावित रिंग रोडच्या कामालाही सुरुवात करावी तसेच केर्ली ते पंचगंगा नदी पूल या रस्त्याची उंची वाढवून रुंदीकरण करावे अशी मागणीही महाडिक यांनी केली. नामदार रवींद्र चव्हाण यांनी या सर्व मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत निधीची तरतूद करण्याचे आश्वासन दिले. 

         यावेळी मा.आ.महादेवराव महाडिक, शौमिका महाडिक, सत्यजित कदम, राजवर्धन नाईक निंबाळकर आदी उपस्थित होते.


कोल्हापूर जिल्ह्यातील विविध रस्त्यांसाठी माजी आमदार अमल महाडिक यांची मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे 200 कोटींची मागणी