बातम्या

छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले जाज्वल्य अभिमान देणारा ऐतिहासिक वारसा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Forts of Chhatrapati Shivaji Maharaj are a proud historical heritage


By nisha patil - 2/8/2024 11:18:08 AM
Share This News:



 छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेले गड किल्ले केवळ वास्तू नसून सर्वांना प्रेरणा आणि जाज्वल्य अभिमान देणारा  ऐतिहासिक वारसा आहे. या वारशाला जागतिक पातळीवर नेण्यासाठी जे आवश्यक असेल ते सर्व प्रयत्न राज्य शासन निश्चितपणे  करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. सर्वांच्या प्रयत्नाने स्वराज्य निर्मिंतीत मोलाचे योगदान देणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे हे 12 किल्ले नक्कीच जागतिक वारसा यादीत समाविष्ट होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

            राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाच्या वतीने ‘भारतातील मराठा लष्करी भूप्रदेश’ जागतिक वारसा नामांकनाबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, कौशल्य विकास विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा, जागतिक वारसा समितीच्या 46 व्या अधिवेशनाचे अध्यक्ष आणि युनेस्को मधील भारताचे राजदूत व स्थायी प्रतिनिधी विशाल शर्मा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, भारतीय पुरातत्व विभागाचे अतिरिक्त महानिदेशक डॉ. जान्विज शर्मा, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या क्षेत्रीय संचालक डॉ. टी. श्रीलक्ष्मी, अधीक्षक शुभा मुजुमदार, सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपसचिव नंदा राऊत, राज्याचे पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक सुजितकुमार उगले आदींची यावेळी उपस्थिती होती.

            जागतिक वारसा स्थळांच्या यादीत महाराष्ट्रातील लष्करी भूप्रदेश या वैशिष्ट्यपूर्ण वारशाचा समाविष्ट व्हावा यासाठी भारताकडून प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. महाराष्ट्रातील साल्हेर, शिवनेरी, लोहगड, रायगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, खांदेरी, राजगड, प्रतापगड हे 11 आणि तमिळनाडू येथील जिंजी अशा 12 किल्ल्यांचा यामध्ये समावेश आहे. या नामांकन प्रक्रियेचे ठोस समर्थन व्हावे आणि याबाबत अधिक मार्गदर्शन होण्याच्या उद्देशाने जागतिक वारसा समितीच्या 46 व्या अधिवेशनाचे अध्यक्ष श्री. विशाल शर्मा यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे बोलत होते.

            मुख्यमंत्री  शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचे 12 गड किल्ले जागतिक वारसा नामांकन प्रक्रियेसाठी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भारतीय पुरातत्व विभाग यांचे विशेष धन्यवाद मानले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज हे असामान्य महापुरुष होते. स्वराज्याची निर्मिती करून त्यांनी एक जाज्वल्य असा इतिहास निर्माण केला. त्यांच्या काळात झालेल्या गड किल्ल्याची निर्मिती ही त्यांची दूरदृष्टी दाखवून देते. जलदुर्गाची निर्मिती करुन त्यांनी स्वराज्य संरक्षणासाठी किती जागरुकता हवी, हे त्याकाळी दाखवून दिले. शत्रुला नामोहरम करण्यासाठी त्यावेळचे तंत्रज्ञान, वास्तू शास्त्र  यांचा अप्रतिम आविष्कार त्यांनी दाखविला. शिवकालीन हे किल्ले पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. आजही हे किल्ले मजबूत स्थितीत आहेत. येथील कणाकणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवणी आहेत. हा इतिहास आपल्या सर्वांना प्रेरणा देणारा आहे. तो आपण जपत आहोत. त्याला जागतिक पातळीवर नेण्याची संधी आपल्याला मिळाली आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले.


छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले जाज्वल्य अभिमान देणारा ऐतिहासिक वारसा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे