बातम्या
गडमुडशिंगीतील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचा पायाभरणी समारंभ संपन्न
By nisha patil - 10/14/2024 9:14:33 PM
Share This News:
विद्युत पारेषण कंपनीच्या सीएसआर फंडातून बांधण्यात येणार्या करवीर तालुक्यातील गडमुडशिंगीतील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या इमारतीचा झाला पायाभरणी समारंभ
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारत असून, विद्यार्थी पटसंख्या वाढत आहे. या विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळावे, चांगल्या सोयीसुविधा मिळाव्यात, यासाठी चांगल्या इमारती असणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने राज्य शासनाकडून निधी दिला जातो. शिवाय काही कंपन्यांकडून सीएसआर फंडही मिळवला जातोय, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. महाराष्ट्र विद्युत पारेषण कंपनीच्या सीएसआर फंडातून, गडमुडशिंगीत जिल्हा परिषदेच्या कुमार आणि कन्या विद्यामंदिर शाळेची इमारत बांधली जाणार आहे. त्याचा पायाभरणी सोहळा आज पार पडला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीने सीएसआर फंडातून शाळा बांधण्यासाठी ६ कोटी ८५ लाखाची रक्कम दिली. या निधीतून करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी इथल्या जिल्हा परिषदेच्या कुमार आणि कन्या शाळेची इमारत बांधण्यात येणार आहे. या इमारतीच्या पायाभरणीचा शुभारंभ, खासदार धनंजय महाडिक आणि माजी आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला. केंद्र आणि राज्य शासनाने सर्वसामान्यांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे, महिलांना मोठा आर्थिक हातभार मिळाला आहे, असे खासदार महाडिक यांनी नमूद केले. रस्ते, विमानतळ, रेल्वे स्थानक यासाठीही कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांच्या इमारती चांगल्या असाव्यात, यासाठी शासनाकडून भरीव निधी मिळतो आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या कंपन्यांचा सीएसआर फंडही मिळू शकतो. या निधीतून शाळांच्या इमारती चांगल्या होतीलच, पण विद्यार्थ्यांना उत्तम सुविधांसह दर्जेदार शिक्षण मिळेल, असे खासदार महाडिक यांनी सांगितले.
यावेळी अमल महाडिक यांनी मनोगत व्यक्त करुन, कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात विविध विकासकामांचा धडाका लावल्याचे सांगितले. यावेळी सरपंच तानाजी पाटील, अशोक दांगट, अनिल पाटील, पंडित पाटील, प्रदीप झांबरे, आप्पासो धनवडे, सचिन कांबळे, वैभव गवळी, मनीष पाटील, सचिन पाटील, दादा धनवडे, रणजित राशिवडे, बाबासो पाटील, जितेंद्र पाटील, गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत नेर्ले, समरजित पाटील यांच्यासह मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
गडमुडशिंगीतील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचा पायाभरणी समारंभ संपन्न
|