बातम्या
सांगलीतील शिराळा येथील स्मृतीस्थळाच्या विकासातून इतिहासातील देदिप्यमान अध्याय नव्या पिढीपर्यंत पोहचेल --उपमुख्यमंत्री अजित पवार
By nisha patil - 3/14/2024 9:40:58 PM
Share This News:
स्वराज्याचे दुसरे छत्रपती स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन अशा सांगली तालुक्यातील शिराळा येथील स्मृतीस्थळ विकास आराखड्यास राज्य शासनाच्या शिखर समितीची मान्यता मिळाली असून उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या नियोजन विभागाने त्यासाठी 13 कोटी 46 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यासंबंधीचा शासननिर्णय नियोजन विभागाने जारी केला आहे. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांना कोकणात अटक करुन पुण्याला नेत असताना, मोगलांच्या ताब्यातून त्यांची सुटका करण्यासाठी स्वराज्याच्या मावळ्यांनी शिराळा येथे दिलेल्या धाडसी लढ्याची माहिती यानिमित्ताने भावी पिढीपर्यंत पोहचेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
पुणे जिल्ह्याच्या शिरुर तालुक्यातील वढु-बुद्रुक येथील स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळ स्मारकाचं तसंच हवेली तालुक्यातील मौजे तुळापूर येथील बलिदानस्थळ आणि परिसराच्या विकासकामांचं भूमीपूजन नुकतंच करण्यात आलं. त्याच धर्तीवर सांगली तालुक्यातील शिराळा स्मृतीस्थळ विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आग्रही होते. आमदार मानसिंगराव नाईक यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींसमवेत सातत्याने बैठका घेऊन त्यांनी यासंदर्भातील कार्यवाही त्वरेने करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार स्मृतीस्थळ विकास आराखडा तयार करुन मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समिचीची त्यास मान्यता घेण्यात आली व 13 कोटी 46 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या विकास आराखड्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली असून 31 मार्च 2026 पर्यंत त्यांना सर्व विकासकामे पूर्ण करायची आहेत.
सांगली जिल्ह्याच्या शिराळा तालुक्यातील स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या या स्मृतीस्थळाचे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यरक्षणाच्या लढ्यात अनन्यसाधारण महत्व आहे. छत्रपती संभाजी महाराजांना कोकणातील संगमेश्वर इथे कैद करुन पुण्याकडे नेले जात असताना त्यांची मोगलांच्या ताब्यातून सुटका करण्याचा साहसी प्रयत्न शिराळ्यातल्या भुईकोट किल्ला परिसरात झाला होता. स्वराज्याच्या मावळ्यांना त्यात यश आलं नसलं तरी स्वराज्याच्या लढ्यातला तो देदिप्यमान अध्याय आहे. तो अध्याय जपण्याचा, त्या लढ्याची माहिती पुढील पिढीपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न शिराळा स्मृतीस्थळ विकास आराखड्याच्या अंमलबजावणीतून करण्याचा प्रयत्न आहे. त्यात निश्चित यश मिळेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
सांगलीतील शिराळा येथील स्मृतीस्थळाच्या विकासातून इतिहासातील देदिप्यमान अध्याय नव्या पिढीपर्यंत पोहचेल --उपमुख्यमंत्री अजित पवार
|