बातम्या

जिल्हा नियोजन मधील निधीमुळे पोलीस विभागात अत्याधुनिकता - पालकमंत्री, हसन मुश्रीफ

Funds in District Planning bring sophistication to police department


By nisha patil - 12/25/2023 7:05:47 PM
Share This News:



जिल्हा नियोजन मधील निधीमुळे पोलीस विभागात अत्याधुनिकता - पालकमंत्री, हसन मुश्रीफ

3.5 कोटी रुपयांतून कोल्हापूर पोलीस दलाला वाहनांचे हस्तांतरण

कोल्हापूर, : आजच्या आधुनिक काळात गुन्हेगारीत वापरण्यात येणारी वाहने तसेच शस्त्रे यांची तुलना सध्याच्या पोलीस दलातील असणाऱ्या वाहनांबरोबर तसेच शस्त्रांबरोबर केली तर लक्षात येईल की पोलीस विभागाच्या बळकटीकरणाची गरज आहे. यातूनच तत्कालीन अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी जिल्हा नियोजन मधून पोलीस विभागाला निधी देण्याचे ठरवले. त्यामुळे खऱ्या अर्थाने राज्यातील पोलीस विभागाचे बळकटीकरण झाले व त्यांच्यात अत्याधुनिकता आली असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. पोलीस विभागात असणारी वाहने, त्यांच्याकडे असलेली शस्त्रे, त्यांची निवास व्यवस्था तसेच त्यांच्या मुलाबाळांसाठी शाळा चांगल्या प्रकारे पुरवून त्यांची मानसिकता सुदृढ करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या सर्व बाबींचा उपयोग कायदा व सुव्यवस्था चांगल्या प्रकारे राखण्यासाठी होईल असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. ते कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाला जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून प्राप्त वाहनांचा हस्तांतरण सोहळा कार्यक्रमावेळी बोलत होते.

ते म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील पोलिसांचा एक चांगला सन्मान आहे, तो सन्मान अजून वाढवा यासाठी आवश्यक सोयी सुविधा उभारण्यासाठी आपण जादा निधी लागल्यास तोही देवू. सध्याच्या गुन्हेगारी वृत्तीला आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही तसेच मोबाईल या उपकरणांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. यासाठी ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या निधीची मागणी करा. येत्या महिनाभरात जिल्हा नियोजन मधील उर्वरित निधीतून मंजूर करू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

कार्यक्रमाची सुरुवात नवीन वाहनांचे पूजन करून झाली. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक व आमदार पी एन पाटील यांच्या हस्ते वाहनांच्या चाव्यांचे हस्तांतरण पोलीस दलाला करण्यात आले. यावेळी खासदार धनंजय महाडिक पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी नवीन बुलेट चालवून वाहनांचे उद्घाटनही केले. जिल्हा नियोजन कडून 3.6 कोटी रुपयांची मंजुरी होती. त्यातील 84 लाख सध्या पोलीस विभागाला दिलेले आहेत. उर्वरीत निधी याच महिन्यात वितरीत केला जाणार आहे. यातून 11 स्कॉर्पिओ, 6 न्यू बोलेरो, 3 बोलेरो,  2 मोठ्या बस, 1 मिनी बस, 1 ट्रक, 12 ग्लॅमर आणि 4 बुलेट, 1 एसी डॉग व्हॅन मारुती इको अशी वाहने घेणार आहेत. पैकी 6 न्यू बोलेरो, 3 बोलेरो, 12 ग्लॅमर, 2 मोठ्या बस आलेल्या आहेत आणि महासंचालक कार्यालयाकडून 1 टेम्पो ट्रॅव्हलर आणि 10 टीव्हीएस आपाचे गाड्या दिलेल्या आहेत यांचा कोल्हापूर पोलीस दलाला हस्तांतरण करण्याचा कार्यक्रम पार पडला. 

या कार्यक्रमाला खासदार धनंजय महाडिक, आमदार पी एन पाटील, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी केले. सूत्रसंचालन पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी केले तर आभार पोलीस उपअधीक्षक सुवर्णा पत्की यांनी केले. या कार्यक्रमासाठी एमटीओ सुरजितसिंह रजपूत यांनी विशेष योगदान दिले.


जिल्हा नियोजन मधील निधीमुळे पोलीस विभागात अत्याधुनिकता - पालकमंत्री, हसन मुश्रीफ