बातम्या
काल रात्री गणपती बाप्पा होता टिळकाशी भांडत
By nisha patil - 9/28/2023 12:15:43 PM
Share This News:
काल रात्री गणपती बाप्पा
होता टिळकाशी भांडत
आपल्या अडचणीची कैफियत
होता पोट तिडकीने मांडत.
देवघरातून तू मला
बाहेर का आणलंस?
तुमच्या लाडक्या देवांच कौतुक
कशाला चार चौघात मांडलंस?
गायलास तू सुरुवातीला
ताल- सुरात आरत्या
केलीस साधी फुलांची आरास
भोंवती रंगीत बत्त्या.
खूप मस्त छान असायचं
आनंद वाटायचा येण्यात
सुख-शांती-समाधान मिळे
चैतन्य तुला देण्यात.
दहा दिवस उत्सवाचे म्हणजे
असे दिव्यत्वाची रंगत
काल रात्री गणपती बाप्पा
होता टिळकांशी भांडत.
पूर्वी प्रवचन, किर्तन गायनाने
मंगलमयी वाटायचे
प्रबोधक, उद्धोधक भाषणानी
विचार उंची गाठायचे.
आत्ता सारखा हिडीसपणा
मुळीच नव्हता तेंव्हा
शांताबाईच्याच नावाचा
आता अखंड धावा.
पिंताबर, शेला, मुकुट
हे माझे खरे रूप
शर्ट, पॅन्ट, टोपी, पागोटे
धिंगाण्याला फक्त हुरूप.
शाडूची माती, नैसर्गिक रंग
गायब आता झाले कुठे?
लायंटिग केलेल्या देखाव्याने
मला दरदरून घाम फुटे.
श्रद्धा- भक्तीभाव- आदर मनीचा
गेला ना रे सांडत
काल रात्री गणपती बाप्पा
होता टिळकाशी भांडत.
माणसां, माणसांनी एकत्र यावे
एकमेकांना समजून घ्यावे
देव-घेव विचारांची करताना
सारे कसे एक व्हावे.
जातीभेद नसावा
बंधुभाव असावा
सहिष्णुतेच्या विचारांनी
नवा गाव वसावा.
मनातला विचार तुझ्या
खरंच होता मोठा
पण आज मात्र खऱ्या विचारांनाचा
बघ मिळालाय फाटा.
पूर्वी विचाराबरोबर असायची
खाण्यापिण्याचाही रेलचेल
आता मात्र देखाव्यामागे
दडलेला असतो काळा खेळ.
पूर्वी बदल म्हणून असायचे
पोहे- चिवडा-चहा- कॉफी
साग्रसंगीत जेवणा सोबत
लाडू- मोदक- पेढे- बर्फी.
आता रात्री भरले जातात
पडद्यामागे दारुंचे पेले
डि, जे, वर नाचत असतात
माजलेले दादांचे चेले.
नको पडूस तू असल्या फंदात
तेंव्हाच मी होतो सांगत
काल रात्री गणपती बाप्पा
होते टिळकांशी भांडत.
कशासाठी उत्सव असा
सांग ना रे बांधलास?
देवघरातून गल्लोगल्ली
डाव माझा मांडलास.
दहा दिवस कानठळ्यांनी
होतो मला आजार
व्यवहारी दुनिया इथली
इथे चालतो लाखोचा बाजार.
रितीरिवाज, आदर-सत्कार
मांगल्याचा नाही पत्ता
देवघरा ऐेवजी माझा
रस्त्यावरती सजतो कट्टा.
जुगार- दारू- सट्टा- मट्टा
अनैतिकतेला येतो ऊत
देवा ऐवजी दैत्याचेच मग
मानेवरती चढते भूत.
सामाजिक बाजू सोडून सुटतो
राजकारणालाच इथे पेव
गौरी- गणपती सण म्हणजे
गैरव्यवहारांची ठेव- रेव.
नको रे बाबा,नको मला हा
मोठेपणाचा तुझा उत्सव
मला आपले तू माझ्या जागी
परत एकदा नेऊन बसव.
कर बाबा कर माझी सुटका
नको मला ह्यांची संगत
काल रात्री गणपती बाप्पा
होता टिळकाशी भांडत.
काल रात्री गणपती बाप्पा होता टिळकाशी भांडत
|