बातम्या

गंगावेस तालीम सर्वोत्कष्ट बनवणार -उपमुख्यमंत्री अजित पवार

Gangaves will make Talim the best  Deputy Chief Minister Ajit Pawar


By nisha patil - 1/29/2024 2:28:10 PM
Share This News:



 राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेल्या तालमीचा हेरिटेज लुक कायम ठेवून गंगावेस तालीम ही सर्वोत्कृष्ट तालीम बनवणार असल्याची घोषणा करुन यासाठी सर्वसमावेशक आराखडा सादर करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला केला 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी श्री शाहू विजयी गंगावेस तालीमला भेट दिली. तसेच येथील मल्लांची व वस्तादांची राहण्याची व्यवस्था, भोजन व्यवस्थेसह परिसराची पाहणी करुन वस्ताद व मल्लांशी संवाद साधला. 
 
     उपमुख्यमंत्री श्री पवार म्हणाले, शाहू महाराजांनी कुस्तीला राजाश्रय दिला, अनेक तालीम बांधल्या. यातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे मल्ल घडले आहेत. हीच परंपरा कायम राहण्यासाठी तालमींमध्ये वस्ताद व मल्लांना सर्व सुविधा असणाऱ्या तालीम बनवणे आवश्यक आहे. यासाठी देशभरातील चांगल्यात चांगल्या तालमींचा अभ्यास करुन त्या धर्तीवर गंगावेस तालमीचा विकास करण्यात येईल. यासाठी विविध आर्किटेक्टकडून सर्व सोयीसुविधांचा समावेश असणारे आराखडे सार्वजनिक बांधकाम विभागाने मागवून घ्यावेत. यातील सर्वोत्कृष्ट आराखडा मंजूर करुन त्यानुसार या तालमीचा विकास करु, असे त्यांनी सांगितले.

गंगावेस तालमीत सध्या 70 मल्लांची राहण्याची सोय असून बऱ्याच मल्लांना बाहेर रहावे लागते. तालमीची पडझड होत असून तालीम व राहण्याची सोय होणे गरजेचे आहे, असे आवाहन वस्तादांनी केले. 
तालमीचे नूतनीकरण करताना याठिकाणी आवश्यक असणाऱ्या सुविधा, ऑलिंपिकच्या धर्तीवर मॅट, माती, स्वच्छतागृह, शॉवर, मजबूत भिंती, कौले, उपलब्ध जागेत मिळणारा एफएसआय आदींबाबत विचार करा, असे सांगून तालमीचा विकास करताना हेरीटेज टच कायम ठेवा, 200 मल्लांची राहण्याची व्यवस्था करा, हवा खेळती राहील व या जागेतील वृक्षतोड होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

 यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता शामराव कुंभार, कार्यकारी अभियंता सर्जेराव पाटील, वस्ताद विश्वासदादा हारुगले, हिंदकेसरी संतोष वेताळ, महान भारत केसरी माऊली जमदाडे, महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख, उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर, तालमीचे अध्यक्ष दीपक जाधव, उपाध्यक्ष राहुल जानवेकर, माजी आमदार चंद्रदीप नरके, माणिक पाटील - चुयेकर, ए.वाय. पाटील, बाबासाहेब पाटील- आसूर्लेकर, आदिल फरास आदी उपस्थित होते.


गंगावेस तालीम सर्वोत्कष्ट बनवणार -उपमुख्यमंत्री अजित पवार