बातम्या

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात १ कोटी ६७ लक्ष युनिट सौरऊर्जा निर्मिती

Generation of 1 crore 67 lakh units of solar power in Kolhapur Sangli district


By nisha patil - 12/6/2024 12:44:21 PM
Share This News:



कोल्हापूर - सौरऊर्जा वापराकडे ग्राहकांचा कल दिवसेंदिवस वाढतो आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील ८ हजार २६९ ग्राहकांनी रुफ टॉप सौर यंत्रणेव्दारे गत एप्रिल महिन्यात १ कोटी ६७ लक्ष युनिट सौरऊर्जा निर्मिती केली आहे. मार्च महिन्यात १ कोटी ५९ लक्ष युनिट तर मे महिन्यात १ कोटी ४३ लक्ष युनिटची निर्मिती केली आहे. सद्यस्थितीत कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात ८ हजार ७४० ग्राहकांनी १२२ मेगावॅट क्षमतेची रुफ टॉप सौरयंत्रणा आस्थापित केली आहे.

केंद्र सरकारच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत घरगुती ग्राहकांना तीन किलोवॅट क्षमतेच्या रुफ टॉप सौर यंत्रणेसाठी ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे. पहिल्या दोन किलोवॅटपर्यंत प्रती किलोवॅट रू.३० हजार अनुदान आहे. ग्राहकांनी रुफ टॉप सौर यंत्रणेव्दारे विजेची निर्मिती करून वापरणे व गरजेपेक्षा अधिक वीजनिर्मिती झाल्यास ग्राहकास वीजबिल शून्य येते अर्थात वीज मोफत मिळते. या योजनेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता मा.श्री.परेश भागवत यांनी केले आहे.

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत  कोल्हापूर जिल्ह्यातील २८३ तर सांगली जिल्हयात ५३ घरगुती ग्राहकांनी लाभ घेऊन अनुक्रमे १०८० किलोवॅट व २०० किलोवॅट क्षमतेची रूफ टॉप सौर यंत्रणा बसविली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात  १ लक्ष ७१ हजार ४०० तर सांगली जिल्ह्यात १ लक्ष १४ हजार ५०० घरगुती ग्राहकांकडे रूफ टॉप सौर यंत्रणा बसविण्याचे लक्ष्य आहे. यापूर्वीच्या एमएनआरई टप्पा २ योजनेत कोल्हापूर जिल्ह्यात ७१८ व सांगली  जिल्ह्यातील ३३२ घरगुती ग्राहकांनी लाभ घेऊन अनक्रमे २८३० किलोवॅट व ११५० किलोवॅट क्षमतेची रूफ टॉप सौर यंत्रणा बसविली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात विनाअनुदानित व अनुदानित तत्वावर ५७८५ ग्राहकांनी ७८.८५ मेगावॅट क्षमतेची रूफ टॉप सौर यंत्रणा बसविली आहे. त्यात घरगुती (३८७६), वाणिज्य (९५४), औद्योगिक (३७१), सार्वजनिक सेवा (२३६) ग्राहकांचा समावेश आहे. सांगली जिल्ह्यात विनाअनुदानित व अनुदानित तत्वावर २९५५ ग्राहकांनी ४३.८३ मेगावॅट क्षमतेची रूफ टॉप सौर यंत्रणा बसविली आहे. त्यात घरगुती (१८०४), वाणिज्य (४९५), औद्योगिक (१७८), सार्वजनिक सेवा (३२४) ग्राहकांचा समावेश आहे.
 


कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात १ कोटी ६७ लक्ष युनिट सौरऊर्जा निर्मिती