बातम्या

सारथीच्या सरसकट सर्व विद्यार्थ्यांना फेलोशिप द्या

Give fellowship to all the students of Sarathi Sarathi


By nisha patil - 12/12/2023 10:57:13 PM
Share This News:



सारथीच्या सरसकट सर्व विद्यार्थ्यांना फेलोशिप द्या

सतेज पाटील : फेरविचार करण्याचे अजित पवार यांचे आश्वासन


कोल्हापूर: राज्य सरकारच्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेकडून (सारथी) मराठा समाजातील पीएच.डी. करणाऱ्या केवळ २०० विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यात येणार आहे. मुळात यासाठी १३८९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. सरकारने जाहिरात काढताना विद्यार्थ्यांच्या मर्यादासंख्येचा त्यात उल्लेख नव्हता. त्यामुळे २०२३ च्या बॅचमधील संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप द्या, अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी मंगळवारी विधानपरिषदेत केली. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फेलोशिपच्या शासन निर्णयासंदर्भात पुन्हा एकदा चर्चा करू, असे आश्वासन आ.पाटील यांना दिले.
 

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेकडून (सारथी) मराठा समाजातील पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप मिळावी या मागणीसाठी कोल्हापुरातील सारथीच्या विभागीय कार्यालयासमोर संशोधक विद्यार्थ्यांचे गेल्या ४३ दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरु आहे. या विद्यार्थ्यांचा प्रश्न आमदार पाटील यांनी अधिवेशनात उचलून धरला.

आमदार पाटील म्हणाले, संशोधक विद्यार्थ्यांनी केलेली तयारी लक्षात घेऊन सरकाराने मर्यादित विद्यार्थी संख्येचा निर्णय पुढील वर्षांपासून लागू करावा. तोपर्यंत २०२३ साठी अर्ज केलेल्या सरसकट सर्व विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यात यावी. शिवाय फेलोशिप पात्रता परीक्षेच्या दिवशीच इतरही शासकीय सेवांच्या परीक्षा असल्याने पात्रता परीक्षेची तारीख बदलावी.

 

कोल्हापूरात सारथी वसतिगृहाची इमारत कधी पूर्ण होणार? छत्रपती शाहू महाराज यांचे म्युझियम कधीपर्यंत पूर्णत्वास येणार? असा सवालही आमदार पाटील यांनी उपस्थित केला. यावर अजित पवार यांनी ही इमारत लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल, तसेच शाहू महाराज यांचे म्युझिअमही लवकरात लवकर पूर्ण करण्याची ग्वाही आ.पाटील यांना दिली.


सारथीच्या सरसकट सर्व विद्यार्थ्यांना फेलोशिप द्या