बातम्या

राजर्षी शाहू महाराजांच्या जनक भूमीतून शाहूराजे छत्रपती यांना मताधिक्य द्या!.. रूपाताई वायदंडे

Give vote to Shahuraje Chhatrapati from the ancestral land of Rajarshi Shahu Maharaj


By nisha patil - 4/28/2024 7:31:32 PM
Share This News:



 राजर्षी छत्रपती शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ऋणानुबंध जपण्यासाठी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या असे  आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) च्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा रूपाताई वायदंडे यांनी आज नानीबाई चिखली, ता. कागल येथील प्रचार संपर्क दौऱ्या दरम्यान केले.
     

लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून उमेदवारी अर्ज माघार घेतल्यानंतर आज सौ. वायदंडे यांनी चिखली येथील महिलांची भेट घेऊन पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार  महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना पाठिंबा जाहीर केल्याचे सांगितले. यावेळी गावातील समाज मंदिरामध्ये मोठ्या संख्येने महिला बैठकीसाठी उपस्थित होत्या. औक्षण व पुष्पवृष्टी करत धुमधडाक्यात व मोठ्या उत्साहाने महिलांनी रूपाताईंचे स्वागत केले.
   

यावेळी बोलताना लोकशाही बळकट करण्यासाठी संविधान प्रेमी महाविकास आघाडीला साथ देऊन आघाडीचे अधिकृत उमेदवार श्रीमंत शाहूराजे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देऊया व भारतीय राज्यघटना अबाधित ठेवूया, असे आवाहन रूपाताई वायदंडे यांनी उपस्थित महिला वर्गास केले. कोणत्याही इमोशनल अत्याचाराला बळी न पडता श्रीमंत शाहू महाराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे खरे वारसदार आहोत हे दाखवून देण्याची वेळ आली आहे असे सांगत, राजर्षी शाहू महाराज यांच्या उपकारातून उतराई होण्याचा एक आणा प्रयत्न करूया, असे त्या म्हणाल्या.
 

उपस्थित सर्व महिलांनी हात उंचावून या भूमिकेचे समर्थन केले व शाहू महाराजांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निश्चय यावेळेस व्यक्त केला.
   

  याप्रसंगी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सरदार कांबळे, शहर संघटक रणजीत उर्फ शेरू हळदीकर, महिला आघाडी जिल्हा कार्याध्यक्षा रूपाली कांबळे, जिल्हा ग्रामीण संघटिका सीमा कांबळे, अमर तांदळे, दयानंद दाभाडे, प्रिया कांबळे, वंदना कांबळे, गीता कांबळे, मालन घस्ते, सुशीला भाले यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
 

यावेळी कार्यकर्त्यां सोबत वायदंडे यांनी चिखली सह कुरली, कागल, कौलगे, खडकेवाडा आदी गावांना शाहू महाराजांच्या प्रचारार्थ भेटी दिल्या.


राजर्षी शाहू महाराजांच्या जनक भूमीतून शाहूराजे छत्रपती यांना मताधिक्य द्या!.. रूपाताई वायदंडे