बातम्या
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या गडहिंग्लज कार्यालयाकडून 2 लाखांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त
By nisha patil - 5/11/2024 10:04:35 PM
Share This News:
विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 अंतर्गत चंदगड तालुक्यातील बिर्डी कान्हूर येथील अडकूर रस्ता ओढ्या शेजारी सरकारी पड जमिनीमध्ये गोवा राज्य निर्मीत व महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेले विदेशी मद्याने भरलेले गोल्डन एस ब्लू फाईन व्हिस्की ब्रॅन्डचे 750 मिलीचे 32 बॉक्स मिळून आले असुन मुद्देमालाची किंमत एकूण 2 लाख 11 हजार 200 रुपये आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सूर्यवंशी, (दक्षता व अंमलबजावणी) विभागाचे संचालक प्रसाद सुर्वे व कोल्हापूर विभागाचे विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर यांच्या आदेशान्वये तसेच कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे, उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गडहिंग्लज या पथकास दिनांक 4 नोव्हेंबर रोजी हा मद्यसाठा आढळून आला.
गोवा बनावटी दारुचा मुद्देमाल विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगला म्हणून पावनोजी भिकाजी पाटील, वय वर्षे 46 रा.गवसे.ता. चंदगड या इसमावर महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 1949 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असल्याची माहिती गडहिंग्लज राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकांनी दिली.
गुन्ह्यामध्ये गुन्ह्याच्या ठिकाणी मिळुन आलेल्या आरोपी व्यतिरिक्त त्याच्या इतर साथीदारांचा सहभाग आहे का, तसेच या मद्याचा सार्वजनिक विधानसभा निवडणुक 2024 मध्ये कोठे पुरवठा केला जाणार होता, याबाबतचा तपास सुरु आहे.
कारवाईत राज्य उत्पादन शुल्क, गडहिंग्लज पथकाचे निरीक्षक प्रमोद खरात, दुय्यम निरीक्षक दिवाकर वायदंडे, दुय्यम निरीक्षक संदिप जाधव, दुय्यम निरीक्षक स्वप्नील पाटील, सहा. दुय्यम निरीक्षक प्रदीप गुरव, जवान संदीप जानकर, जवान संदीप चौगुले, जवान भरत सावंत, जवान स्वप्नाली बेडगे, जवान नि- वाहनचालक अविनाश परीट यांचा सहभाग होता. गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक प्रमोद खरात करीत आहेत, असे गडहिंग्लज राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकांनी कळवले आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या गडहिंग्लज कार्यालयाकडून 2 लाखांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त
|