बातम्या

‘गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना

Gobarse Samriddhi Carbon Credit Biogas Scheme of Gokul


By nisha patil - 10/22/2024 6:41:32 PM
Share This News:



कोल्हापूर, ता.२२: कार्बन क्रेडीट योजनेंतर्गत कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ,कोल्हापूर (गोकुळ) व एन.डी.डी.बी.मृदा तसेच सिस्टीम बायो यांच्या आर्थिक व तांत्रिक सहकार्यातून ‘गोबरसे समृद्धी’ कार्यक्रमाअंतर्गत संपूर्ण देशामध्ये गोकुळने ही योजना अत्यंत प्रभावीपणे राबविली असल्याने  जिल्ह्यातील गोकुळच्या ५,७४३ दूध उत्पादकांचे अत्यंत अल्प किमतीत बायोगॅस प्रज्वलित झाले आहेत. या बायोगॅस योजनेमुळे जिल्हयातील महिला दूध उत्पादकांना २० कोटी २५ लाख इतके अनुदान मिळाले आहे. मागील वर्षी या योजनेला दूध उत्पादकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे या योजनेच्या टप्पा दोन मध्ये सन २०२४-२५ साला करिता नवीन ४,००० बायोगॅस मंजूर झाले असल्याचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी सांगितले.  

या योजनेमधील बायोगॅसच्या नवीन मॉडेलमध्ये वाढीव क्षमता व सुरक्षिततेसाठी काही सुधारणा केल्या असून, यामध्ये दीर्घकाळ चालणारा आधुनिक चार्जिंग लाइटर, शेण कालावण्यासाठी मिक्सिंग टूल (मिक्सर), गॅसच्या सुरक्षिततेसाठी जादा सेफ्टी व्हॉल्व व पुनर्वापर करता येणारा फिल्टर या नवीन गोष्टीचा समावेश केला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरती कार्बन क्रेडीट अनुदानात घट झाल्यामुळे सिस्टीमा कंपनीच्या टप्पा दोन मधील नवीन बायोगॅसचे अनुदान कमी झाले आहे. २ घनमीटर बायोगॅस युनिटची वरील सुधारणेसह एकूण रु.४१,२६० इतकी किमत असून, अनुदान वजा जाता रुपये ९,९९९ इतकी रक्कम दूध उत्पादकांनी भरणा करावयाची आहे. बायोगॅसचे अंतर १५० फुटापेक्षा जास्त असलेस १५०० रुपये बुस्टर पंपासाठी भरावयाचे आहे.     

कार्बन क्रेडीट बायोगॅस योजनेमुळे हजारो दूध उत्पादक महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले असून. दूध उत्पादक कुटुंबाच्या घरगुती वापरासाठी होणाऱ्या गॅस सिलेंडरच्या खर्चामध्ये वार्षिक जवळ जवळ १५ ते १८ हजार रुपयांची बचत होत आहे. तसेच बायोगॅस मधून बाहेर पडणारी बायोस्लरी शेतीला सेंद्रिय खत म्हणून वापरली जात असल्यामुळे खतांच्या खर्चामध्ये ५० टक्के बचत होऊन शेतीचे सेंद्रिय उत्पादन वाढण्यास मदत होत आहे. या बायोगॅस योजनेमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती मजबूत होण्यास नक्कीच हातभार लागला आहे. या नवीन योजनेमध्ये १५०० महिला दूध उत्पादकांनी नोंदणी केली असून जिह्यातील जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी केले आहे.
 


‘गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना